‘ह्याला गाड... त्याला गाड’चे राजकारण
By Admin | Published: April 23, 2015 12:53 AM2015-04-23T00:53:25+5:302015-04-23T00:55:12+5:30
‘गोकुळ’च्या दुधाला उकळी : क्रॉस व्होटिंगच्या शक्यतेने सत्तारूढ गटाला चिंता _- गोकुळ निवडणूक
राजाराम लोंढे -कोल्हापूर शेवटच्या टप्प्यात ‘गोकुळ’च्या दुधाला चांगलीच उकळी आली असून, विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यातूनच ‘ह्याला गाड... त्याला गाड’च्या राजकारणाने जोर धरला आहे. राधानगरी, भुदरगड, करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यांत याची लागण झाल्याने ‘क्रॉस व्होटिंग’ मोठ्या प्रमाणात होणार आहे. या धसक्याने सत्तारूढ गट चिंतेत आहे.
‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ राजर्षी शाहू पॅनेल व राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलमध्ये सामना होत आहे. ठराव गोळा करण्यापासून सत्तारूढ गटाने निवडणुकीवर आपली पकड घट्ट केली होती. इच्छुकांची संख्या सत्तारूढ गटाकडे जास्त होती; त्यामुळे पॅनेलची बांधणी करताना नेत्यांची पुरती दमछाक झाली. दोन चेहरे वगळता जुन्यांनाच संधी दिल्याने सत्तारूढ गटावर नाराजी ओढवली. अनेकांनी उघड, तर काहींनी छुपा विरोध केला आहे. जुन्या संचालकांकडे एकगठ्ठा मतदान असले तरी त्यांच्या कारभारावर नाराजही तितकेच आहेत. त्यामुळे सत्तारूढला निवडणूक सोपी नाही.
राजकीय अपरिहार्यता म्हणून दोन्ही पॅनेलमधील काही मंडळी एकत्र आली आहेत. विधानसभा, साखर कारखाने निवडणुकीतील वार ताजे असल्याने कार्यकर्त्यांच्या मनातील जखमा अजूनही भळभळत आहेत. त्यामुळे दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी कितीही दावे-प्रतिदावे केले तरी क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात होणार, हे निश्चित आहे. करवीर, पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांत आपली सोय पाहूनच मतदान होणार आहे. कोणाला गाडायचे, कोणाला पाडायचे याची यादीच ठरावधारकांना देण्यात आली आहे. एका नेत्याने सत्तारूढ पॅनेलमधील दोन महिला, दोन विद्यमान संचालकांना मतदान करण्याचे थेट आदेश दिले आहेत; तर दुसऱ्या नेत्याने एक वगळूनच मतदान करा, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. एका ज्येष्ठ नेत्यांनी ‘सहा माजी अध्यक्षांना पहिले धरा आणि बाकी काय करायचे ते करा,’ असे सांगितले आहे. विरोधी पॅनेलमध्येही असेच सोयीचे राजकारण सुरू आहे. विधानसभेला मदत केलेल्या नेत्यांच्या उमेदवारांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय आपला शब्द मानणाऱ्या इतर नेत्यांमार्फत आपल्या विरोधकांचा पत्ता कापण्याच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. विधानसभेतील पाडापाडीच्या राजकारणाचे धुमारे अजूनही विझलेले नाहीत. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत या धुमाऱ्यांनी अधिक पेट घेतल्याने मातब्बर उमेदवारांना त्याचे चटके सोसावे लागणार आहेत. त्यामुळे क्रॉस व्होटिंगचा धसका सत्तारूढ गटातील उमेदवारांनी घेतला आहे.
एका मतासाठी ‘लाख’मोलाच्या तडजोडी
शेवटच्या टप्प्यात मतांची कागदावरील गोळाबेरीज जोरात सुरू होती. यामध्ये किती उचलले, आपल्याला कोणाचे मत मिळेल, पॅनेलला नसले तरी आपणाला एक मत मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. काठावरील एक-एक मत खेचण्यासाठी शेवटचे दोन दिवस ‘लाख’मोलाच्या तडजोडी झाल्या.
शपथही वगळूनच!
दोन्ही गटांकडून काही ठरावधारकांना सहलीवर पाठविलेले आहे; तर उर्वरित अर्थपूर्ण घडामोडीही जोरात सुरू आहेत. पॅनेल टू पॅनेल मतदानाची शपथ देताना ठरावधारक ‘त्या’ उमेदवारांना वगळूनच मनातल्या मनात शपथ घेत आहेत.