परस्पर सहकार्याने शहराची वाहतूक कोंडी फोडणे शक्य
By admin | Published: February 14, 2015 12:03 AM2015-02-14T00:03:45+5:302015-02-14T00:06:51+5:30
मनोजकुमार शर्मा : महापालिकेत ‘कोल्हापूर सेफ सिटी’चे सादरीकरण
कोल्हापूर : महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी पोलीस प्रशासन फोडू शकते. शहरातील मैदाने व शाळांच्या जागेत पे-पार्क करणे, एकेरी वाहतुकीसह पार्किंग व्यवस्था नसलेल्या रुग्णालये व मंगल कार्यालयांचा परवाना रद्द करणे, आदी कठोर उपायांची गरज असल्याचे मत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत व्यक्त केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त पी. शिवशंकर व स्थायी समितीचे सभापती आदिल फरास होते.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ‘कोल्हापूर सेफ सिटी’ या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंद यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या ‘एमआयपीएल’ या संस्थेने शहरातील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून शहर सुरक्षित करण्याबाबतचा पाच कोटी रुपयांचा प्रकल्प महापालिकेस सादर केला. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, नगररचना सहसंचालक डी. एस. खोत, आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.शहरातील पार्किंग व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. किमान अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तरी येथील सोयीबाबत समाधान व्यक्त केले पाहिजे, अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे. शिवाजी स्टेडियम, दसरा चौक, सासने मैदान, आदींच्या बाहेरील रिकामा भाग, काही मोठ्या शाळांच्या मैदानांचा थोडा भाग पे-पार्कसाठी वापरण्याच्या पर्यायावर विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेने पोलीस प्रशासनासोबत दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घ्यावी, अशी सूचना डॉ. शर्मा यांनी मांडली. पोलीसांच्या सर्व प्रयत्नांना महापालिका प्रशासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन आदिल फरास व राजेश लाटकर यांनी दिले.
महापौरांची अनुपस्थिती
प्रकल्प सादरीकरणासाठी महापौर तृप्ती माळवी यांना निमंत्रित करूनही त्या अनुपस्थित राहिल्या. सोमवारी
(दि. १६)ला राजीनाम्याबाबत सभा होत आहे. या सभेला त्या येतील किंवा नाही याबाबत बैठकीत कुजबुज सुरू होती.
सेफ सिटीचे फायदेवाहतूक नियंत्रण
गुन्हेगारी नियंत्रण
पर्यटकांना सुविधा देणे
नागरिकांना सुरक्षेची खात्री
स्मार्ट सिटीच्या दृष्टीने पहिले पाऊल
असा आहे सेफ सिटी प्रोजेक्ट
फ ायबर आॅप्टिकलद्वारे अत्याधुनिक कॅमेरे महत्त्वाच्या चौकांत बसणार
हे कॅमेरे चेहरापट्टी ओळखण्याइतपत तंत्रयुक्त असतील
१८० अंशांतील चित्र रेकॉर्ड होणार
या सर्वांचे नियंत्रण पोलीस मुख्यालयात असेल