जिवाणूंमधील प्रतिजैविक प्रतिकारक्षमता निष्प्रभ करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:38 AM2020-12-16T04:38:53+5:302020-12-16T04:38:53+5:30
कोल्हापूर : विविध रोगांना कारणीभूत असणाऱ्या जिवाणूंमध्ये निर्माण होत असलेली प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही जागतिक स्तरावर भेडसावणारी एक प्रमुख आरोग्यविषयक ...
कोल्हापूर : विविध रोगांना कारणीभूत असणाऱ्या जिवाणूंमध्ये निर्माण होत असलेली प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही जागतिक स्तरावर भेडसावणारी एक प्रमुख आरोग्यविषयक समस्या आहे. या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागाच्या संशोधकांनी मूलभूत स्वरूपाचे संशोधन केले आहे. त्यात त्यांनी जिवाणूंमधील ही प्रतिजैविक प्रतिकारक्षमता निष्प्रभ करणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे. विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागातील संशोधक प्रा. डॉ. के. डी. सोनवणे आणि त्यांच्या चमूने अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर) या संदर्भात हे संशोधन केले आहे.
डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधे अगर प्रतिजैविके त्याच प्रमाणात घ्यावयाची असतात; पण तसे न करता लोक स्वतःच स्वतःचे उपचार करू लागतात आणि त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम संभवतात. केवळ जिवाणूजन्य आजारांवर प्रतिजैविके उपयुक्त असतात. मात्र सर्वच आजारांवर त्याचा प्रयोग केला जातो, हेही घातक आहे. या औषधांचा अतिप्रमाणात अगर अयोग्य वापर केला असता विविध रोगांना कारक असणाऱ्या सूक्ष्मजिवांमध्ये प्रतिजैविक प्रतिकारक्षमता (अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स) निर्माण होते. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने सन २०१४ मध्ये प्रकाशित एका अहवालात, सध्या वापरात असलेली प्रतिजैविके काही वर्षांनंतर लाभदायक अगर परिणामकारक ठरू शकणार नाहीत, असा इशारा दिला आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या विषयावरील संशोधन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने केले. त्यात डॉ. सोनवणे यांच्यासह डॉ. ऋषिकेश परुळेकर, अस्मिता कांबळे, एस. आर. वाघमारे, एन. एच. नदाफ, सागर बराले यांचे योगदान आहे.
चौकट
काय आहे संशोधन?
जिवाणूंमध्ये ही प्रतिजैविक प्रतिकारक्षमता कशी निर्माण होते, या दिशेने संशोधन केंद्रित केले. या अंतर्गत जिवाणूंत प्रतिरोध निर्माण करणारे एक नवीन वितंचक (एन्झाईम) आढळून आले. त्या एन्झाईमचा सर्वंकष अभ्यास या संशोधनांतर्गत करण्यात आला. त्या एन्झाईमचा प्रतिरोध करू शकणाऱ्या सेंद्रिय रेणूचाही (इन्हिबिटर) सूक्ष्मजीवशास्त्रीय व बायोइन्फॉर्मेटिक्स पद्धतींचा वापर करून शोध लावला आहे. या संशोधनावरील शोधनिबंध आंतरराष्ट्रीय विज्ञानपत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.
प्रतिक्रिया
जिवाणूंमध्ये निर्माण होणारी प्रतिजैविक प्रतिकारक्षमता ही भविष्यात मानवी आरोग्यासमोरील मोठी आव्हानात्मक समस्या आहे. त्यावरील उपायांसंदर्भातील हे संशोधन भविष्यवेधी स्वरूपाचे आहे.
-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू
प्रतिक्रिया
विद्यापीठातील हे संशोधन जिवाणूंत निर्माण होत असलेली प्रतिजैविक प्रतिकारक्षमता समजून घेणे व निष्प्रभ करण्याच्या दृष्टीने जागतिक स्तरावर उपयुक्त आहे. मानव, प्राणी व वनस्पती यांच्यावरील विविध रोगांवरील उपचारांसाठी प्रभावी ठरणारे आहे.
- डॉ. के. डी. सोनवणे
फोटो (१५१२०२०-कोल-के डी सोनवणे (युनिव्हर्सिटी)