रात्रभर पावसाने झोडपले, राधानगरीचे चार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 07:50 PM2021-08-04T19:50:14+5:302021-08-04T20:20:46+5:30

Rain Kolhapur : मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून, त्यातून ७ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला.

It rained all night, opening the four gates of Radhanagari | रात्रभर पावसाने झोडपले, राधानगरीचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणाचे बुधवारी सकाळी साडेदहा वाजता दोन आणि दुपारी दोन असे एकूण चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले. त्यातून ७ हजार ११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली.

Next
ठळक मुद्देरात्रभर पावसाने झोडपले राधानगरीचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : क्षणात येती सर सर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे या खास श्रावण सरींसाठीचे काव्य वर्णन कोल्हापुरात चक्क आषाढात अनुभूतीस येत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले असून, त्यातून ७ हजार १२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला. त्यामुळे ओसरू लागलेला पूर पुन्हा चढू लागला आहे. धरणांच्या पाणलोटसह गगनबावड्यातही अतिवृष्टी झाली आहे.

चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. ऊनही पडत असल्याने महापुरातून जनता सावरत होती. त्यातच सोमवारपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. नुसत्याच भुरभुरणाऱ्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर मात्र संपूर्ण जिल्हाभर चांगलाच जोर धरला.

रात्री तर मुसळधार सरींनी मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाच्या आठवणी ताज्या केल्या. पाऊस कमी झाल्याने राधानगरी धरणातून केवळ विद्युत विमोचकासाठीचाच १४०० क्युसेक विसर्ग सुरू होता; पण मंगळवारी रात्री झालेल्या या पावसाने बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पाच मिनिटांच्या फरकाने ६ आणि ३ नंबरचा स्वयंचलित दरवाजात उघडला. त्यातून ४ हजार २५६ क्युसेक विसर्ग भोगावती पात्रात सुरू झाला.

दुपारी चारच्या सुमारास ५ आणि ४ क्रमांकाचे दोन दरवाजे उघडल्याने पात्रातील विसर्ग ७ हजार क्युसेकवर पोहोचला. त्यामुळे पंचगंगेची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २२ फूट १० इंचांवर होती.

नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

पाऊस कमी झाल्याने पात्राकडे नद्या येत होत्या; पण मंगळवारपासून पावसाने जोर धरल्याने पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, वारणेसह सर्व नद्या अजूनही पात्राच्या बाहेरूनच वाहत असून पाणीपातळी वाढत असल्याने नदीकाठानजीक पूरस्थिती कायम आहे.

पाणलोटसह गगनबावड्यात अतिवृष्टी

जिल्ह्यात बुधवारी दुपारी १२ पर्यंत आलेल्या अहवालानुसार धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह गगनबावड्यात अतिवृष्टी झाली आहे. सर्व धरणांच्या पाणलोटात सरासरी ३० ते १६६ मि.मी. पाऊस नोंदवला गेला आहे, तर तालुक्यामध्ये सर्वाधिक ७० मि.मी. पाऊस गगनबावड्यात झाला आहे. राधानगरी ३२, भुदरगड २८, चंदगड २४, करवीर २३, आजरा व पन्हाळा १८, कागल १७, गडहिंग्लज ९, हातकणंगले ७, शिरोळ ५ मि.मी. असा पाऊस पर्जन्यमापकावर नोंदविला गेला आहे.

अजूनही १९ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
भोगावती : हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे
वारणा: चिंचोली, माणगाव, खोची
कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे, आळवे
दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सिद्धनेर्ली

Web Title: It rained all night, opening the four gates of Radhanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.