मारेकरी सापडत नाहीत हेच खेदजनक
By admin | Published: April 15, 2015 12:44 AM2015-04-15T00:44:58+5:302015-04-15T00:44:58+5:30
उमा पानसरे यांचा उद्वेग : हल्ल्याला दोन महिने पूर्ण
कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याला उद्या, गुरुवारी दोन महिने पूर्ण होत आहेत. तरीही हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा तपास करीत असताना मारेकरी सापडत नाहीत, याची खंत वाटते, अशी उद्विग्नता त्यांच्या पत्नी श्रीमती उमा पानसरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
पानसरे दाम्पत्य १६ फेब्रुवारीला सकाळी फिरायला गेल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरापासून काही अंतरावरच हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यामध्ये गोविंद पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक किंवा आर्थिक व्यवहारातून झाली आहे का, अशी शक्यता गृहीत धरून त्या अनुषंगाने पोलिसांनी सर्व पातळ्यांवर माहिती घेतली. तथापि, या संदर्भात पोलिसांना कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदार उमा पानसरे यांच्याकडून तपास अधिकारी अंकित गोयल यांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याकडूनही अद्याप पूर्णत: माहिती प्राप्त झालेली नाही.
उमा पानसरे यांना जितके आठवेल तितकी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी काही गुन्हेगारांचे फोटो त्यांना दाखविले; परंतु ते त्यांना ओळखता आले नाहीत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या सेवेला मुलगी स्मिता पानसरे आहेत. त्यांच्या बंगल्याभोवती आजही सशस्त्र पोलीस बंदोबस्त आहे. पानसरे यांच्यावरील हल्ल्याला उद्या दोन महिने पूर्ण होत आहेत. या हत्येचा तपास लागलाच पाहिजे; परंतु पोलिसांना अद्यापही मारेकरी सापडलेले नाहीत, ही मनाला खंत वाटते, अशी उद्विग्नता उमा पानसरे यांनी व्यक्त केली.
पानसरे हत्येच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त फोन कॉल्सची चौकशी केली. सराईत गुन्हेगार, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती, नातेवाईक, आदींसह सुमारे ६०० लोकांचे जबाब घेतले. चार संशयास्पद दुचाकी जप्त केल्या आहेत. राज्यभरातील २५ विशेष पथके याप्रकरणी मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)