बनावट नोटांच्या टोळीने दहा कोटींच्या नोटा बाजारात खपविल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:43 AM2019-11-22T00:43:04+5:302019-11-22T00:43:17+5:30
कोल्हापूर : बनावट नोटांचा कारखाना काढून कोट्यवधी रुपयांचे चलन बाजारात आणणाऱ्या टोळीने दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे दहा कोटी रुपये ...
कोल्हापूर : बनावट नोटांचा कारखाना काढून कोट्यवधी रुपयांचे चलन बाजारात आणणाऱ्या टोळीने दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे दहा कोटी रुपये बाजारात आणल्याचे गुन्हे अन्वेषण पथकाच्या तपासात उघड होत आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा हात आहे का, याचाही तपास सुरू आहे. कापड व्यापारी राहुल नेसरी (वय ३०, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) याने या नोटा खपविण्यात पुढाकार घेतल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इचलकरंजी येथे कारवाई करून टोळीचा म्होरक्या जीवन वरुटे, सागर कडलगे यांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाखांच्या बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठी लागणारी सामग्री जप्त केली. त्यानंतर कापड व्यापारी राहुल नेसरी यालाही अटक केली. त्याने व्यवसायाच्या माध्यमातून जास्त नोटा बाजारात आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या प्रकरणी पोलिसांनी इचलकरंजी येथील दातार मळ्यात रविवारी (दि. १७) बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकून दोघांना अटक केली होती. तेव्हापासून या टोळीतील इतर संशयितांचा पोलीस शोध सुरू आहे. टोळीने बनावट नोटा खपवून त्याद्वारे मिळवलेली संपत्ती कुठे लपविली आहे; किती नोटा छापल्या; महाराष्ट्राबाहेर त्यांचे एजंट आहेत का? हुबळी, धारवाड, आदी ठिकाणी टोळीचे कनेक्शन आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
दोन महिन्यांत खपविल्या नोटा
दोन महिन्यांच्या या कालावधीत या टोळीने सुमारे १० कोटी रुपयांचा बनावट नोटा खपविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. विशेष म्हणजे या कालावधीत विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे नेमक्या किती बनावट नोटा बाजारात आल्या, याचाही तपास पोलीस कसोशीने करीत आहेत.