Kolhapur: हुपरीतील चांदी व्यावसायिकाचा खून भावानेच केल्याचे निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:40 PM2024-09-24T13:40:19+5:302024-09-24T13:41:00+5:30
हुपरी : येथील चांदी व्यावसायिक ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा सख्खा भाऊ प्रवीण ...
हुपरी : येथील चांदी व्यावसायिक ब्रम्हनाथ सुकुमार हालुंडे (वय ३१, रा. सिल्व्हर झोन वसाहत हुपरी) यांचा सख्खा भाऊ प्रवीण सुकुमार हालुंडे यानेच कौटुंबिक कलह, वाटणी व व्यावसायिक स्पर्धेतून मित्राच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे व शिरोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी जलदगतीने तपास यंत्रणा राबवून काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणी भाऊ पवन सुकुमार हालुंडे (वय २६) व त्याचा मित्र आनंदा शिवाजी खेमलापुरे (२२, दोघेही रा. वाळवेकरनगर हुपरी) यांना पोलिसांनी रविवारी रात्रीच संशयावरून ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर घटनास्थळावरून लंपास केलेली सुमारे १५ लाख रुपये किमतीची चांदीचे दागिने आनंदा खेमलापुरे याच्या घरातून जप्त केले. हुपरी पोलिसांनी या दोघांना अटक करून पुढील तपासांसाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ब्रम्हनाथ हालुंडे व भाऊ प्रवीण यांचा परपेठेवरील सराफांच्या मागणीनुसार चांदी दागिने बनवून घेऊन पोहोच करण्याचा व्यवसाय होता. प्रवीणच्या पेठेवरील खातेदार सराफांना ब्रम्हनाथ हे कमी वेस्टेजमध्ये दागिने द्यायचे त्यामुळे दोघांत वेळोवेळी वाद होत असत. तसेच प्रवीणने चार-पाच वर्षांपूर्वी केलेला प्रेमविवाहही कुटुंबाला मान्य नव्हता. त्यामुळे त्याला घरातून बाहेर काढले होते. त्याला वडिलांच्या मिळकतीत वाटणी देण्यात येत नव्हती.
प्रवीणच्या याच कृत्यामुळे मोठा भाऊ असूनही ब्रम्हनाथ याचा विवाह होण्यामध्ये अडथळे येत हाेते. अशा विविध प्रकारच्या कारणातून ब्रम्हनाथ याने कांही दिवसांपूर्वी प्रवीणच्या अंगावर चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे मित्र आनंदा खेमलापुरे याच्या मदतीने ब्रम्हनाथ यांचा खून केल्याची कबुली भाऊ पवन याने दिली.