उचगाव परिसरासाठी ती रुग्णवाहिका ठरली आधावरवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:25+5:302021-05-29T04:18:25+5:30
मोहन सातपुते उचगाव : रात्री-अपरात्री एखाद्याला आरोग्याचा त्रास व्हायला लागला की कुटुुंबातील सदस्यांची रुग्णवाहिका बोलवण्यासाठी धांदल उडते. ती वेळेत ...
मोहन सातपुते
उचगाव : रात्री-अपरात्री एखाद्याला आरोग्याचा त्रास व्हायला लागला की कुटुुंबातील सदस्यांची रुग्णवाहिका बोलवण्यासाठी धांदल उडते. ती वेळेत येईल याची शाश्वती नाही, आलीच तर रुग्णाला रुग्णालयापर्यंत पोहचवण्यासाठी ती किती भाडे घेईल या चिंतेनेच प्रत्येकजण ग्रासला जातो. मात्र, उचगाव (ता.करवीर) परिसरातील हिंदुस्थानी मित्र मंडळाने गेल्या सहा वर्षांपासून असंख्य रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवून त्यांना जीवनदान दिले आहे. तेही कोणतेही शुल्क न आकारता....विशेष म्हणजे कोविडसारख्या महामारीच्या काळातही या मित्रमंडळाने तब्बल सातशेंहून अधिक रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून वेळेत रुग्णालयात पोहचवून सामाजिक बांधीलकी जपली आहे. रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या मंडळाने
१५ ऑगस्ट २०१५ ला उचगावात पहिल्यादा रुग्णवाहिका सुरू केली. ही सेवा त्यांनी प्रत्येकाला मोफत दिली. त्यामुळे आजपर्यंत हजारो रुग्ण वेळेत रुग्णालयापर्यंत पोहचवण्याचे कार्य या मंडळाने केले आहे. २०१९ च्या कोल्हापुरात आलेल्या महापुरावेळी सांगली फाटा ते तावडे हाॅटेल चौक येथे लष्कराच्या बोटीतून आणलेले ९ मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकेची मदत घेण्यात आली होती. शिवाय १३ गंभीर रुग्णांना रुग्णालयात वेळेत पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले होते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत तब्बल ४८७ कोविड रुग्ण याच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल झाले होते. तर दुसऱ्या लाटेत २९८ कोविड रुग्णांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्याची कार्य या रुग्णवाहिकेने केले आहे.
कोट : रात्री अपरात्री कुठेही रुग्णांवर प्रसंग ओढवला तरी रुग्णवाहिकेची चाक थांबत नाहीत. त्यामुळे पदरमोड करून रुग्णवाहिका सुरू ठेवली आहे. त्याचा लाभ आजवर अनेकांना झाला आहे.
नामदेव वाईगडे, संस्थापक,
हिंदुस्थानी युवक मित्र मंडळ.
कोट : मी गेली चार वर्ष झाले या रुग्णवाहिकेवर चालक आहे. मला हिंदुस्थानी युवक मित्र मंडळ व एन. डी. ग्रुपने लोकसेवेची संधी दिली आहे. रात्री -अपरात्री रुग्णांसाठी रुग्णवाहिकेसोबत जातो. अनेकांचे जीव वाचवले आणि फुकट सेवा देत असल्याने अनेक रुग्ण हक्काने रुग्णवाहिकेचा नंबर मागत असतात.
संदीप पाटील,
रुग्णवाहिका वाहक.
फोटो : २८ उचगाव रुग्णवाहिका
ओळ: उचगाव येथील हिंदुस्थानी युवक मित्र मंडळाने सुरु केलेल्या मोफत रुग्णवाहिकेचा असंख्य रुग्णांना फायदा झाला आहे.