अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ कोणी घ्यायची हेच ठरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:12+5:302021-06-24T04:17:12+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुढे या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पध्दतीही निश्चित ...

It was not decided who would take the CET for the 11th admission | अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ कोणी घ्यायची हेच ठरेना

अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ कोणी घ्यायची हेच ठरेना

googlenewsNext

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुढे या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पध्दतीही निश्चित केली. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. पण, ही सीईटी शिक्षण विभाग, राज्य परीक्षा परिषद, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग (एसएससी, एचएससी बोर्ड) यापैकी कोणी घ्यायची हेच अद्याप ठरलेेले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सीईटीची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

मूल्यांकनाची पध्दती निश्चित झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यात सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण ‌विभागाने घेतला. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी असणार आहे. त्यासाठी शंभर गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर असणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी दोन तासांची वेळ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. सीईटी देण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती असणार नाही. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतील, त्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना मूल्यांकन पध्दतीने दहावीला मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांची महाविद्यालयनिहाय निवड यादी जाहीर करून त्यांना अकरावीमध्ये प्रवेश दिला जाईल. दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक महिना उरला आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी सीईटी घेतल्यास ते पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सीईटी कोणी घ्यायची हे लवकर निश्चित होऊन या परीक्षेची तारीख जाहीर होणे आवश्यक आहे.

चौकट

शासन आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर शहरात अकरावीची केंद्रीय प्रवेश परीक्षा आम्ही ऑनलाईन पध्दतीने राबवित आहोत. यावर्षी शासन आदेशानुसार सीईटी घेण्याची आमची तयारी आहे. त्याबाबतच्या शासन आदेशाची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

विद्यार्थी, पालक काय म्हणतात?

आमचे मूल्यांकन पूर्ण करून पुढील महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होणार असेल, तर सीईटीची तारीख लवकर जाहीर करावी. ज्यामुळे आम्हाला या परीक्षेची तयारी करता येईल.

- अनुराग पोवार, विद्यार्थी, टेंबलाईवाडी.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी : ५६७६४

मुलांची संख्या : ३१६२३

मुलींची संख्या : २५१४१

अकरावी प्रवेशाच्या जिल्ह्यातील जागा : ३५०००

जिल्ह्यातील महाविद्यालये : १५०

अकरावी प्रवेशाच्या शहरातील जागा : १४६००

शहरातील महाविद्यालये : ३५

Web Title: It was not decided who would take the CET for the 11th admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.