अमावस्येलाच अडकले ‘ते’ रेशीमगाठीत
By admin | Published: June 16, 2015 10:59 PM2015-06-16T22:59:27+5:302015-06-17T00:39:56+5:30
अशुभाला मानले शुभ : अजित अन् हेमा यांचा नोंदणी पद्धतीने विवाह
सातारा : अमावस्येला कोणत्याही शुभकार्याचे नियोजन केले जात नाही. या ‘अशुभ’ दिवसाला ‘शुभ’ करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कऱ्हाड येथील कार्यकर्त्याने घेतला. मंगळवारी (दि. १६) अमावस्येच्या ‘मुहूर्ता’वर मुलगा अजित आणि हेमा हे लग्नाच्या रेशीम बंधनात बांधले गेले अन् त्यांनी वैवाहिक जीवनाला प्रारंभ केला.
अमावस्या ही नैसर्गिक कालचक्रासाठी अत्यावश्यक असल्याचे विज्ञान सांगत असले तरी आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत. दूरगावी जायचे असले तरी अनेकजण रद्द करतात. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अमावस्येला करत नाहीत. हा समज दूर करण्यासाठी कऱ्हाडचे सीताराम चाळके यांनी नातेवाइकांचे मन वळवून, प्रसंगी काहींचा रोष पत्करून आपला मुलगा अजित याचा विवाह हेमा यांच्याशी अमावस्येला करण्याचा निर्णय घेतला.
लग्न आयुष्यात एकदाच होणारी घटना आहे. ती अविस्मरणीय व्हावी, म्हणून मोठा गाजावाजा केला जातो. मात्र नसानसात चळवळ भिनलेल्या चाळके कुटुंबीयांनी बँडबाजा, डॉल्बी, वरात, कर्मकांडे, होम आदींना फाटा दिला. सातारच्या नोंदणी अधिकाऱ्यांसमोर हा विवाह नोंदणी पद्धतीने उरकला. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते अन् मोजकेच नातेवाइक उपस्थित होते. त्यानंतर एका हॉटेलमध्ये जेवण उरकले अन् विवाहसोहळा पार पडला.
हा विवाह अविस्मरणीय ठरावा, यासाठी सायंकाळी स्वागत समारंभ आयोजित केला होता. यावेळी हिंदी-मराठी गीतांबरोबरच चळवळीतील, परिवर्तनाचा विचार सांगणाऱ्या प्रबोधनपर गाण्यांची मैफलीचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)
विजेने साधला नेमका मुहूर्त
अजित आणि हेमा यांचा विवाह नोंदणी पद्धतीने होणार होता. त्यांनी तो साध्या पद्धतीने करण्यासाठी फारसे कोणालाही निमंत्रण दिले नव्हते. मात्र, अमावस्येला लग्न करुन समाजात चांगला पायंडा पाडणार असल्याने ‘लोकमत’ने याची दखल घेतली होती. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी असंख्य लोक वऱ्हाड बनून नोंदणी कार्यालयात ठिक बारा वाजता आलेही; पण वीज वितरण कंपनीनं नेमका मुहूर्त साधला. मंगळवार असल्याने दिवसभर विद्युतपुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नोंदणी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साडेदहालाच लग्न करण्याची विनंती केली अन् नाईलाजाने लग्न करावेही लागले. यामुळे बाराच्या मुहूर्तावर आलेल्यांची मात्र निराशा झाली.