नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 02:20 PM2023-09-11T14:20:23+5:302023-09-11T14:20:54+5:30

पक्षाचे काम थांबवून विकास आघाडी करणार, निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्ष

It was the leaders who ended the BJP in Kolhapur district, Arun Desai alleged | नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप 

नेत्यांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप संपविला, अरुण देसाईंचा आरोप 

googlenewsNext

आजरा : चंदगड विधानसभेप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भाजपचे दोन - दोन उमेदवार देण्याचे काम झाल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनीच संपविल्याचा घणाघाती आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अरुण देसाई यांनी केला. आजपासून भाजपचे काम थांबवून विकास आघाडी म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आजरा येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

आजरा तालुक्यात भाजपचा विचार जिवंत ठेवण्याचे काम निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केले. चंद्रकांत पाटील मंत्री झाले; पण कार्यकर्त्यांसाठी काही उपयोग झाला नाही. पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या विकासकामाबाबत अपेक्षा होत्या; पण त्यांना न्याय देऊ शकलो नाही ही खंत असल्याचे प्रा. सुधीर मुंज यांनी सांगितले. भाजपला सुवर्णकाळ असतानाही बाहेरच्या लोकांना आत घेतले. त्यांनीच पक्ष हायजॅक केला. जिल्ह्याच्या नेत्यांनी निष्ठावंतांचा विश्वासघात करून अन्याय केला आहे. त्यामुळे भाजपतून आम्ही मुक्त झालो आहोत, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी सांगितले. 

भाजपच्या जोखडातून आम्ही मुक्त झालो आहे. यापुढे पक्षाचे कोणतेही बंधन आमच्यावर नाही. त्यामुळे आम्ही आमची ताकद दाखवून यापुढे सोयीचे राजकारण करणार असल्याचे साखर कारखाना संचालक मलिक बुरूड यांनी सांगितले. जिल्ह्यात भाजपच्या कामाऐवजी गटाची दुकानदारी सुरू झाली आहे. आम्ही भाजपचा जप करायचा व आमचे खच्चीकरण करून जिल्ह्याच्या नेत्यांनी उपऱ्यांना बळ दिले आहे, असा आरोप नाथा देसाई यांनी केला. पत्रकार परिषदेला महादेव टोपले, धनाजी पारपोलकर, दयानंद भुसारी, रमेश कारेकर आदी उपस्थित होते.

निष्ठावंतांकडे चंद्रकांत पाटील यांचे दुर्लक्ष

आजऱ्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची कामे करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळ नाही. मात्र, उपऱ्यांची कामे ते तातडीने करतात. पक्षात बाहेरच्यांना घ्या, पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना संपवू नका, असे अनेक वेळा बैठकांतून सांगितले. मात्र, त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असाही आरोप अरुण देसाई यांनी केला.
 

Web Title: It was the leaders who ended the BJP in Kolhapur district, Arun Desai alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.