ते कारखाने सुरू होऊ देणार नाही...; राजू शेट्टी यांचा इशारा
By भीमगोंड देसाई | Published: August 24, 2023 08:12 PM2023-08-24T20:12:52+5:302023-08-24T20:13:04+5:30
साखर कारखान्यांकडून काटामारी करून शेतकऱ्यांची प्रचंड लुट केली जाते.
कोल्हापूर : देशातर्गंत बाजारपेठेत साखरेचा प्रतिक्विंटल भाव ३८०० ते ३९०० रूपये राहिला आहे. यामुळे गत गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपये दसऱ्यापूर्वी द्यावा, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबरला बाजार समितीच्या आवारातील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा ताराराणी पुतळ्यापासून दुपारी १२ वाजता सुरू होईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी दिली.
साखर कारखान्यांकडून काटामारी करून शेतकऱ्यांची प्रचंड लुट केली जाते. हे थांबण्यासाठी यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व साखर कारखान्यांनी डिजिटल वजन काटे बसवावेत, यासाठी शासन आणि साखर आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. जे कारखाने असे काटे बसवणार नाहीत, त्यांचा हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.