करवीर पंचायत समितीचे काम सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:25+5:302021-07-29T04:24:25+5:30

कसबा बावडा : पुराच्या पाण्यात बुडालेल्या करवीर पंचायत समितीमधील पुराचे पाणी आता पूर्णपणे ओसरले असले तरी पंचायत समितीचे ...

It will take two weeks for the work of Karveer Panchayat Samiti to go smoothly | करवीर पंचायत समितीचे काम सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागणार

करवीर पंचायत समितीचे काम सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागणार

googlenewsNext

कसबा बावडा : पुराच्या पाण्यात बुडालेल्या करवीर पंचायत समितीमधील पुराचे पाणी आता पूर्णपणे ओसरले असले तरी पंचायत समितीचे कामकाज सुरळीत सुरू होण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी जावा लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या पंचायत समितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिलेली नाही.

करवीर पंचायत समिती जयंती नाल्याच्या शेजारी आहे. त्यामुळे पूर आला की नाल्याचे पाणी पंचायतीच्या आवारात हमखास येते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली आलेल्या पुरात पंचायत समिती बुडाली होती. त्यावेळी दफ्तर खराब झाले होते. तब्बल पंधरा दिवस कर्मचारी दफ्तर वाढविण्याचे कामच करत होते. आता मात्र कर्मचाऱ्यांनी सावध होऊन पुराचे पाणी वाढत असतानाच दफ्तराची बांधाबांध करून ते मेन राजाराम हायस्कूलमध्ये हलवले. त्यामुळे दफ्तर वाचले, मात्र अन्य साहित्य पुराच्या पाण्यात बुडून खराब झाले आहे.

तब्बल दहा फूट पाणी पंचायत च्या सर्व विभागात होते. त्यामुळे लाखडी टेबल-खुर्च्या, फर्निचर खराब झाले आहे . ठिकठिकाणचे वायरिंग तुटले आहे. स्विच खराब झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा कुलरही खराब झाला आहे. सर्व विभाग चिखलाने माखले आहेत. त्याच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. स्वच्छतेसाठी लागणारे खराटा, झाडू, फिनेल, पाण्याचा टँकर हे कुठून आणायचे आणि त्यासाठी पैसे खर्च कोण करणार असा प्रश्नही कर्मचारी वर्गातून उपस्थित होत आहे. एकंदरीत पंचायत समितीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

चौकट: आज सभापती पदाची निवड

करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील यांनी राजीनामा दिल्याने आज, गुरुवारी नूतन सभापती पदाची निवड पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे सभागृहाची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे.

फोटो: पुरात बुडालेल्या करवीर पंचायत समितीमध्ये साफसफाई करताना पंचायतच्या महिला कर्मचारी.

(फोटो: रमेश पाटील )

Web Title: It will take two weeks for the work of Karveer Panchayat Samiti to go smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.