रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:18 PM2023-08-29T12:18:52+5:302023-08-29T12:19:25+5:30

इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य

It would have been better if words like bloodshed could have been avoided, explained Minister Hasan Mushrif | रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण

रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, मंत्री हसन मुश्रीफांचे स्पष्टीकरण

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांच्या बैठकीत दूधगंगेतून पाण्यासंदर्भात अनावधानाने माझ्याकडून गेलेला रक्तपातासारखा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. दूधगंगा काठावरील लोकभावनांचा उद्रेक पाहता इचलकरंजीला दूधगंगेतून पाणी मिळणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे इचलकरंजी समन्वय समितीने सामंजस्याने कृष्णेतून पाण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मंत्री मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा नदीतील पाणीप्रश्नी महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात भुदरगड, राधानगरी, करवीर, कागल, शिरोळ या पाच तालुक्यांतील आणि कर्नाटकच्या सीमाभागातील दूधगंगा काठावरील शेतकऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी काळमवाडी धरणातील पाणीसाठा संपल्यामुळे पिण्यासह शेतीच्या पाण्याचीही प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे जनता अक्षरशः कासावीस झाली होती. त्यावेळी आणि परवा झालेल्या बैठकीतही अनेक संतप्त वक्त्यांनी रक्तपाताची भाषा केली. तेच वाक्य अनावधानाने माझ्याकडून गेले. हा शब्द टाळता आला असता तर बरे झाले असते.

आतापर्यंत इचलकरंजीसाठी अनेक पाणी योजना झाल्या. कृष्णा नदीवरून मजरेवाडी येथून पाणी योजनाही झाली आहे. इचलकरंजीतील नागरिक आमचेच असून त्यांना शुद्ध पाणी मिळाले पाहिजेच, पण ती योजना कृष्णा नदीतून मजरेवाडीवरूनच झाली पाहिजे.

दूधगंगेतून यापूर्वी कार्यक्षेत्र सोडून अनेक गावांतील शेती पाणीपुरवठा संस्थांना पाणी दिले आहे. त्यातच धरणाच्या गळतीमुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने आमच्या जमिनी देऊन जमिनी जाऊनही आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळणार नाही ही तीव्र भावना दूधगंगा काठावरील गावांतील शेतकऱ्यांमध्ये आहे.

इचलकरंजी पाणी योजनांचे सोशल ऑडिट करा

याबाबत, आपण खा. संजय मंडलिक आणि राजेंद्र पाटील -यड्रावकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून विनंती करणार आहोत. या योजने संदर्भात बैठक घेण्याआधी इचलकरंजी शहरासाठी झालेल्या सगळ्या योजनांचा आढावा घ्या. त्यांचे सोशल ऑडिट करा आणि मगच बैठक घ्या, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

‘मजरेवाडी’ योजनेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे घालू

इचलकरंजीसाठी कृष्णा नदीवरून मजरेवाडी योजनेसाठी आणखी निधी लागल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून साकडे घालू. परंतु दूधगंगेकडे येण्याचे त्यांनी धाडस करू नये, असेही मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: It would have been better if words like bloodshed could have been avoided, explained Minister Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.