श्रद्धेला कर्मकांडाद्वारे सुरूंग लावणे चुकीचे

By admin | Published: May 4, 2016 12:12 AM2016-05-04T00:12:07+5:302016-05-04T00:12:07+5:30

नीलिमा सावंत-वर्तक : पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे ठराव; सुभाष देसाई यांना तलवार भेट

It is wrong to have faith through ritualistic rituals | श्रद्धेला कर्मकांडाद्वारे सुरूंग लावणे चुकीचे

श्रद्धेला कर्मकांडाद्वारे सुरूंग लावणे चुकीचे

Next

कोल्हापूर : धर्म म्हणजे कर्मकांड नसून ते एक तत्त्वज्ञान आहे. त्यात श्रद्धेचा भाग आहे. या श्रद्धेला कर्मकांडांच्या माध्यमातून सुरूंग लावणे चुकीचे आहे. देवाला नाही तर, धर्माच्या ठेकेदारांना अनेक अपेक्षा असतात. धर्माची चिरफाड आणि श्रद्धेला सुरूंग लावण्याच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याची गरज आहे; असे प्रतिपादन अ‍ॅड. नीलिमा सावंत-वर्तक यांनी मंगळवारी येथे केले.
येथील आई अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीतर्फे आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई, उमाताई पानसरे प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी समितीतर्फे आवाजी मतदानाद्वारे ठराव करण्यात आले.
अ‍ॅड. सावंत-वर्तक म्हणाल्या, देवांसह विविध धर्म तत्त्वज्ञानामध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव केलेला नाही. त्यामुळे मंदिर प्रवेशाचा वाद निरर्थक ठरतात. राज्यघटनेने समानतेचा आधार दिलेला आहे. तरीही परस्पर निर्णय घेऊन एखाद्याला श्रद्धेपासून दूर करता येणार नाही.
डॉ. देसाई म्हणाले, तुम्ही दिलेली तलवार ही आई जगदंबेची असून मला लढण्यास बळ देणारी आहे. समाजवादी लोकशाही सध्या संपुष्टात येत असून धार्मिक शक्ती वाढत आहे. या शक्ती ब्रिटिशांपेक्षा वाईट असून त्यांना रोखण्यासाठी जागृत होण्याची गरज आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजू चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडे सादर केले. त्यानंतर संघर्ष समिती व विविध पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. सुभाष देसाई यांना आत्मसंरक्षणासाठी तलवार भेट देत पाठिंबा दिला. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा जयश्री चव्हाण, शैलजा भोसले, सुनीता पाटील, सुवर्णा तळेकर, सीमा पाटील, वसंतराव मुळीक, व्यंकाप्पा भोसले, अतुल दिघे, इंद्रजित सावंत, चंद्रकांत यादव, दिलीप पोवार उपस्थित होते. विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सीमा कोर्इंगडे यांनी आभार मानले.

आवाजी मतदानाने केलेले ठराव असे
महापौर व सर्व नगरसेवकांनी अंबाबाई देवीचे मूळ स्वरूप त्वरित घडवावे. शिवाय असा ठराव सर्वसाधारण सभेत करावा.
राज्य शासनाने जनतेच्या मागणीनुसार देवीची सुचिन्हे स्थापित करावीत. देशाच्या घटनेतील तत्त्वानुसार स्त्री-पुरुषांना मंदिरात प्रवेश द्यावा.
रस्त्यांवरील दिशादर्शक फलक ‘अंबाबाई मंदिर’ असे करावेत.
कोल्हापुरातील खासदारांनी ‘हरिप्रिया व महालक्ष्मी एक्स्प्रेस’चे नाव ‘अंबाबाई एक्स्प्रेस’ असे करावे.
आजपर्यंत आई अंबाबाईच्या भक्तांची राजरोस फसवणूक करून मूर्तीची मोडतोड करून धर्माचा धंदा करणाऱ्या पुजाऱ्यांना कायमचे हाकलून द्यावे.
सर्व समाजांतील स्त्रियांची पगारावर पुजारी म्हणून नेमणूक करावी.

समानतेचा संदेश
या कार्यक्रमात संयोजकांनी व्यासपीठावर केवळ महिलांना स्थान देऊन त्यांचा सन्मान केला. त्यातून त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला.

कोल्हापुरात मंगळवारी आई अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती व्याख्यानात बोलताना अ‍ॅड. नीलिमा सावंत-वर्तक.

कोल्हापुरात मंगळवारी आई अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती व पुरोगामी संघटनांतर्फे डॉ. सुभाष देसाई यांना तलवार भेट देण्यात आली. यावेळी शेजारी सतीशचंद्र कांबळे, व्यंकाप्पा भोसले, दिलीप पोवार, अतुल दिघे, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, चंद्रकांत यादव उपस्थित होते.

Web Title: It is wrong to have faith through ritualistic rituals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.