आयटीआयची बुधवारपासून प्रवेशाची पहिली फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 04:46 PM2020-09-07T16:46:06+5:302020-09-07T16:49:46+5:30
शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी बुधवार (दि. ९)पासून सुरू होणार आहे. तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) अर्ज करण्यास अजून चार दिवसांची मुदत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड यादी गुरुवारी (दि. १०) प्रसिद्ध होणार आहे.
कोल्हापूर : शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पहिली फेरी बुधवार (दि. ९)पासून सुरू होणार आहे. तंत्रनिकेतनसाठी (पॉलिटेक्निक) अर्ज करण्यास अजून चार दिवसांची मुदत आहे. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची निवड यादी गुरुवारी (दि. १०) प्रसिद्ध होणार आहे.
जिल्ह्यातील आयटीआयसाठी एकूण ५१,३०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी (दि. ५) सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार प्रवेशाच्या पहिल्या फेरीची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. पॉलिटेक्निकसाठी अर्ज करण्याची मुदत गेल्या तीन दिवसांपूर्वी वाढली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत अर्ज करता येतील.
शहरातील विविध ३४ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. ही यादी गुरुवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सुमारे चार हजार जणांनी दिली जेईई
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शिक्षण देणाऱ्या आयआयटी, एनआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या वतीने (नॅशनल टेस्टिंग एजन्सी, एनटीए) मंगळवार (दि. १) ते रविवार (दि. ६ सप्टेंबर) दरम्यान संयुक्त प्रवेश परीक्षा (जॉइंट एंटरन्स एक्झाम (जेईई मेन्स) घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.