यही तो वक्त है सूरज तेरे निकलने का... : जावेद अख्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:47 AM2020-02-21T00:47:09+5:302020-02-21T00:49:34+5:30
कोल्हापूर : आज देश असंतोषाच्या वाटेवरून जात आहे. नागरिकत्व कायद्याच्या आडून भारतीय संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, एकतेला नेस्तनाबूत करण्याचा ...
कोल्हापूर : आज देश असंतोषाच्या वाटेवरून जात आहे. नागरिकत्व कायद्याच्या आडून भारतीय संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, एकतेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होत आहे. या अंधारल्या वातावरणात नवी पिढी ही आशेचा किरण आहे. भारतीयांच्या रक्तात लोकशाही भिनली आहे. ती आता पुन्हा क्रांती करील... ‘गुलिस्ता के फूल कभी एकरंगी नहीं होते... कियारत नहीं नाम लेती ढलने का..यही तो वक्त है सूरज तेरे
निकलने का...’ असा आशावाद व्यक्त करीत ज्येष्ठ कवी, विवेकी विचारवंत जावेद अख्तर यांनी गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायद्यासह देशाच्या सद्य:स्थितीवर परखडपणे भाष्य केले.
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने शाहू स्मारक भवनात आयोजित स्मृती जागर सभेत त्यांनी ‘भारत : नव्या स्वातंत्र्यलढ्याच्या उंबरठ्यावर’ या विषयावर विवेचन केले. गोळीला विचाराने उत्तर देत झालेल्या या जागर सभेला पुरोगामी कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या कार्याला सलाम करीत विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार केला. यावेळी मिलिंद मुरुगकर लिखित ‘सीएए, एनआरसी म्हणजे काय?’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
तुषार गांधी म्हणाले, आज सगळ्यांनी अराजकतेला स्वीकारले आहे. आपली सहनशीलता इतकी वाढली आणि सहिष्णुता इतकी कमी झाली आहे की, आपण विरोध करीत नाही, प्रश्नही विचारीत नाही. त्यांची बाजू सत्याची नाही म्हणून ते विचारांसमोर अपयशी झाले. अपयश झाकण्यासाठी गोळ्या झाडल्या जातात. मात्र, या विरोधात जनतेत असंतोष निर्माण होत नाही तोपर्यंत क्रांती घडणार नाही. ही वेळ कडवी दवाई पिण्याची आहे. देशाची एकसंधता मोडली जात असताना सगळ्यांनी हातातील साखळदंड तोडले पाहिजेत.
यावेळी पाहुण्यांना गोविंद पानसरे लिखित समग्र साहित्य व डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू गौरवग्रंथ भेट देण्यात आले. जागरसभेपूर्वी ‘चायवाले की दुकान’ हे देशातील असंतोष अणि अराजकतेवर भाष्य करणारे लघुनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, हमीद दाभोलकर, उमा पानसरे, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.
मायदेशातच विस्थापित
सुधारित नागरिकत्व कायद्यावर टीका करताना अख्तर यांनी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जंत्रीच वाचून दाखविली. ते म्हणाले, देशात करोडो गरीब नागरिक असे आहे, ज्यांना जन्मतारीख, ठिकाण माहीत नाही. भारतीयत्वाचा पुरावा नाही. पुरावा नसेल तर आसाममध्ये जे झालं ते होणार आणि याच देशातील नागरिकांना परदेशी ठरवत निर्वासित प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
इस शहर कि मिट्टी को चूमना चाहता हूॅँ...
भाषणाच्या सुरुवातीला जावेद अख्तर यांनी आपण राजर्षी शाहूंच्या नगरीत आलो याचा आनंद व्यक्त करीत ‘इस शहर कि मिट्टी को चूमना चाहता हूॅँ...!’ अशा भावना व्यक्त केल्या. तुषार गांधी यांनी पानसरे यांचे मारेकरी गेली पाच वर्षे सापडत नाहीत, ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगितले.
हम देखेंगे लाजिम है कि हम भी देखेंगे...
जागर सभेच्या व्यासपीठाची व्यवस्थाही विवेकी विचारांनी साकारली होती. पडद्यावर गोविंद पानसरे यांना पाठीत गोळ्या लागलेले छायाचित्र लावले होते. त्यावर शायर फैज यांची ‘हम देखेंगे लाजिम है कि हम भी देखेंगे...’ ही ओळ लिहिली होती. कार्यक्रमासाठी नागरिकांनी सभागृह खचाखच भरल्ल्याने व्हरांड्यातही बसण्याची सोय केली होती.
मशाल सुलगानी होगी...
तुषार गांधी म्हणाले, लोकशाही हा भारताचा आत्मा आहे. हा आत्मा आणि चेहराच बदलला जात आहे. आधीच खूप उशीर झाला आहे. आता आपण प्रयत्न करूया कि तो सौम्य राहील. अंधकार इतना बढ गया है कि मोमबत्ती से काम नहीं चलेगा... मशाल सुलगानी होगी. कम्फर्टवाली क्रांती नहीं ये गदर का वक्त है... क्रांती करण्यासाठी परवानगीची गरज नाही. चुकतंय तिथे विरोध करा. देशप्रेम हा राजद्रोह असेल तर मी जेलमध्ये जायला तयार आहे... फक्त बिर्याणी तयार ठेवा...
याचा ठेका तुम्हाला कोणी दिला?
जावेद अख्तर म्हणाले, भारताच्या एकसंधतेला तोडण्याचा प्रयत्न १९०५ सालापासून सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भाजप एक विभाग आहे. त्यांना देशाचे स्वातंत्र्य मान्य नव्हते, म्हणून ते कधीही इंग्रजांविरोधात लढले नाहीत. आरएसएस आणि मुस्लिम लीगने स्वातंत्र्यचळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याचे फळ जिनांना मिळाले.
पण वंचित राहिलेल्या ‘आरएसएस’चा असंतोष उफाळून येत आहे. अमुक एक मुस्लिम नेता ‘आम्ही १५ कोटी मुस्लिम तुम्हा १०० कोटींवर भारी पडू,’ असं म्हणतो, एक हिंदुत्ववादी संघ देश तोडण्याचा प्रयत्न करतो; पण आमचा प्रश्न हा आहे की, याचा ठेका तुम्हाला कोणी दिला? यावेळी त्यांनी ढासळलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचाही आढावा घेतला. ‘अंधेरे का समंदर’ या कवितेने त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.
एन. डी. पाटील यांनी कार्यक्रमावेळी अशीही जपली बांधीलकी
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिजागर कार्यक्रमात ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना सभागृहातील उष्म्यामुळे काहीसे अस्वस्थ वाटून भोवळ आल्यासारखे झाले; परंतु त्यांनी कार्यक्रमातून मध्येच उठून जाण्यास नकार देऊन वेगळीच बांधीलकी जपली. ते शेवटपर्यंत ते कार्यक्रमासाठी थांबले होते. कार्यक्रम सायंकाळी सव्वापाच वा.च्या सुमारास सुरू झाला. त्याच्या आधीपासूनच प्रा. पाटील सभास्थळी बसून होते. शाहू स्मारक हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे सभागृहात चांगलाच उष्मा जाणवत होता. त्यातच प्रा. पाटील हे सभागृहाच्या मधेच बसले असल्याने तेथे फॅनची हवा येत नव्हती. सातच्या सुमारास त्यांना थोडी भोवळ आल्यासारखे झाले. तातडीने त्यांना गोड खायला देऊन पाणी देण्यात आले. त्याशिवाय त्यांच्यासाठी फॅनचीही व्यवस्था करण्यात आली. अस्वस्थ वाटत असेल तर घरी जाऊया, असे त्यांना सुचविण्यात आले; परंतु प्रा. पाटील यांनी मला काही झालेले नाही, असे सांगत कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जाण्यास नकार दिला. साडेसात वाजता कार्यक्रम संपल्यावरच त्यांनी सभागृह सोडले.