भांडवलदारांच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली : भालचंद्र कानगो
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 05:08 PM2022-11-21T17:08:25+5:302022-11-21T17:09:04+5:30
२०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.
कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्यांचा आयटक आणि कामगार हिताच्या विचारांना विरोध, तर भांडवलदारांना पाठिंबा आहे, अशा विचारांचे सरकार सध्या देशात सत्तेवर आहे. देशातील सरकारने कामगारांसाठी काम करावे, असे वाटत असेल तर सध्याच्या भाजप सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आता आली आहे. या सरकारला सत्तेतून बाहेर काढून घरचा रस्ता दाखविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करा, असे आवाहन ‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी येथे केले.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) १९ व्या राज्य अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दसरा चौक येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष दिलीप पोवार होते. कानगो म्हणाले, कामगार विरोधी सरकार केवळ भांडवलदारांसाठी देशाचा कारभार करीत आहे. देशाच्या कारभार कोणासाठी हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. २०२४ मध्ये मतदानाच्या माध्यमातून ते आपल्याला दाखवून द्यावे लागेल.
‘आयटक’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा म्हणाले, सार्वजनिक उद्योग कवडीमोल दराने भांडवलदारांच्या घशामध्ये घातले जात आहेत. त्यामुळे कामगारांनी सामाजिक, राजकीय दृष्टीने सक्रिय व्हावे.
राज्यपालांनी त्वरित राजीनामा द्यावा
छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहेत; पण राज्यपाल सातत्याने त्यांचा अवमान करीत आहेत. त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. गायरान जमिनीवर ज्यांचे अतिक्रमण आहे, ती जमीन त्या व्यक्तीच्या नावावर करण्यात यावी, अशी मागणी डॉ. कानगो यांनी या ठरावांद्वारे केली.
हिवाळी अधिवेशनावर सर्व कामगार संघटनांचा मोर्चा
महाराष्ट्रातील मोठे उद्योग गुजरातला गेले आहेत. यामुळे राज्यात मोठ्या संख्येने बेरोजगारी निर्माण होणार आहे. याचा जाब सध्याच्या ईडी सरकारला विचारण्यासाठी २८ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती डॉ. भालचंद्र कानगो यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
मोदींच्या पराभवाचा ठराव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगारांच्या सुरक्षेचे सर्व कायदे मोडीत काढले आहेत. सरकारी संस्थांचे गतीने खासगीकरण करीत आहेत. कामगार नेहमी खाली मान घालून काम करावेत आणि भांडवलदार, मोठ्या उद्योजकांना फायदा व्हावा, असे धोरण पंतप्रधान मोदी राबवत आहेत. यामुळे २०२४च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याचा ठराव आयटकच्या अधिवेशनात करण्यात आल्याचे कानगो यांनी सांगितले.
मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या
ईव्हीएम यंत्रावरील निवडणुकांवर अनेकांचे आक्षेप आहेत. यामुळे प्रगत देशात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका होतात. प्रगत देशाचा आदर्श घेऊन देशातही सार्वत्रिक निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, असा ठराव करण्यात आल्याचे कानगो यांनी स्पष्ट केले.