ज्येष्ठांना पीएच.डी. संशोधनाची संधी - डॉ. भूषण पटवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:55 PM2019-03-09T23:55:21+5:302019-03-09T23:59:39+5:30
ज्येष्ठ नागरिक केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात, त्यांना वय, शिक्षण, आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनाची मुभा देण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)
कोल्हापूर : ज्येष्ठ नागरिक केवळ ज्ञानार्जनाच्या आनंदासाठी पीएच.डी.चे संशोधन करू इच्छितात, त्यांना वय, शिक्षण, आदी कोणतीही अट न लावता त्यांना संशोधनाची मुभा देण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) सकारात्मक आहे. यासंदर्भातील आयोगाने स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे, अशी माहिती नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन दिली.
शिवाजी विद्यापीठातील अधिष्ठाता, अधिविभागप्रमुख आणि संचालक यांच्याशी शैक्षणिक धोरणांच्या अनुषंगाने आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.डॉ. पटवर्धन म्हणाले, राष्ट्रीय महत्त्वाचे उपक्रमही हाती घेण्यास विद्यापीठांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विशेषत: मानव्यविद्या, भाषा, भाषाविज्ञान यांसारख्या विद्याशाखांसाठीही भरघोस तरतूद करून त्यासंदर्भातील संशोधनाला चालना देण्याचे धोरण ‘युजीसी’ने स्वीकारले आहे.
क्रेडिट गुण...
विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ प्रवेशित शिक्षण संस्थेबरोबरच सुटीच्या कालावधीत अन्य ठिकाणांहून जरी एखादा अभ्यासक्रम केला, तर त्याचे क्रेडिट गुण त्याला मिळावेत, यासाठी नॅशनल अकॅडेमिक क्रेडिट बँक हा एक अभिनव उपक्रम युजीसीच्या विचाराधीन असल्याचेही डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.
नामफलकाचे अनावरण
बैठकीनंतर डॉ. पटवर्धन यांच्या हस्ते कुलपती उद्यानाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे या उद्यानात त्यांच्या हस्ते नारळाचे रोप लावण्यात आले. यावेळी उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, अधीक्षक जाधव उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, विद्यापीठाने आजपर्यंत युजीसीच्या विविध उपक्रम, प्रकल्पांत सक्रिय सहभाग दर्शविला आहे. येथून पुढील काळातही नूतन उपक्रमांतही हिरीरिने सहभागी होईल.प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी यावेळी स्वागत व परिचय करून दिला. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, व्ही. टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, आदी उपस्थित होते.