जे. पी. नाईक स्मारकासाठी केवळ ६० लाख
By admin | Published: June 8, 2015 12:14 AM2015-06-08T00:14:21+5:302015-06-08T00:54:21+5:30
राज्य सरकारने निधी द्यावा : दोन कोटी ३० लाख खर्च अपेक्षित, कामे अपूर्ण
रवींद्र येसादे - उत्तूर -ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकाचे काम बहिरेवाडी (ता. आजरा) येथील जन्मगावी सुरू आहे. लोकशाही आघाडी सरकारकडून दोन कोटी ३० लाख खर्चाचे स्मारक मंजूर करण्यात आले. त्यापैकी ६० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, या ६० लाखांत केवळ स्मारकाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. उर्वरित निधीची पूर्तता राज्य सरकारने करावी, अशी मागणी शिक्षणप्रेमींकडून होत आहे.
माजी जलसंपदामंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून स्मारकाचे काम सुरू करण्यात आले. आघाडी सरकारने ६० लाखांचा निधी मंजूर केला. त्यापैकी ४० लाखांचा निधी कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला. केवळ स्मारकासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली.
स्मारकासह संरक्षण भिंत, सांस्कृतिक सभागृह, सुशोभीकरण, तलाव सुशोभीकरण, आदी कामे करावयाची आहेत. युती शासन आल्यानंतर या स्मारकासाठी एकाही रुपयाची तरतूद करण्यात आली नसल्याचे समजते. यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी शासनदरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
मिळालेल्या निधीचा वापर डॉ. जे. पी. नाईक यांच्या स्मारकासाठी करण्यात येत आहे. उर्वरित रक्कम मिळाल्यानंतरच सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे अभियंता जयसिंग चव्हाण यांनी सांगितले.
चंद्रकांतदादांनी स्मारकाच्या निधीसाठी प्रयत्न करावेत
सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हे स्मारक पूर्ण होण्यासाठी निधीची तरतूद करून द्यावी व लवकरात लवकर हे स्मारक पूर्ण व्हावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.