जॅकवेलचे नवे ‘खर्चिक’ डिझाईन यापूर्वीच नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 01:11 AM2017-07-31T01:11:00+5:302017-07-31T01:11:08+5:30
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणात बांधण्यात येणाºया जॅकवेलचे नवे डिझाईन पुढे आणून थेट पाईपलाईन योजनेची किंमत वाढविण्याचा काहींनी संगनमताने केलेला प्रयत्न उधळून लावला आहे. हे जॅकवेल अधिक भक्कम करण्याच्या नावाखाली १८ कोटी रुपये खर्चाची किंमत ३० ते ३२ कोटींपर्यंत वाढविण्याचे नवे डिझाईन कोल्हापूर महानगरपालिकेने दि. ९ जून २०१७ रोजीच नाकारले आहे. त्याऐवजी आर्थिकदृष्ट्या परवडेल असे नवे डिझाईन करण्याचा सल्ला महापालिकेने ‘युनिटी’ला दिला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाºया थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामात खर्चाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरवासीयांसाठी ही पाणी योजना अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचे काम युनिटी कन्सल्टंटला दिले आहे, तर जीकेसी ही ठेकेदार कंपनी काम करत आहे, पण ही योजना सुरू झाल्यापासून विविध कारणांस्तव वादाच्या भोवºयात सापडली आहे. प्रथम विविध परवानग्यांपाठोपाठ मार्गावरील गावांचा विरोध, त्यानंतर ठिकपुर्ली येथील लोखंडी पूल अशा अनेक कारणांनी ही योजना गाजत आहे.
ठिकपुर्ली येथील सुमारे अडीच लाख रुपये खर्चाच्या लोखंडी पुलावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च दाखविला होता, पण महापालिकेतील विरोधी आघाडीने या खर्चाचा भंडाफोड करून प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्यामुळे योजनेत सुरू असलेल्या गैरप्रकाराला काहीअंशी चाप बसला आहे. या पुलाच्या वाढीव खर्चाची रक्कम आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वसूल केली, पण आता काळम्मावाडी धरणात बांधावयाच्या जॅकवेलचा नवा प्रश्न महापालिकेसमोर उभारला होता.
यापूर्वी ‘युनिटी’ने या जागेत जॅकवेल उभारणीसाठी सुमारे १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरला होता, पण आता ‘युनिटी’नेच जॅकवेलचे नवे डिझाईन समोर आणून त्यामध्ये सुमारे १२ ते १५ कोटी रुपये वाढविण्याचा घाट रचला होता. जॅकवेलचे काम पाण्यात टिकेल असे भक्कम करणारे हे नवे डिझाईन असल्याचा प्रकार पुढे आणला आहे. त्यामुळे या जॅकवेलच्या खर्चाचा अतिरिक्त बोजा सोसायचा कोणी हा नव्याने प्रश्न उभारला होता. याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांसोबत चर्चा करून हे नवे डिझाईन दि. ९ जून २०१७ रोजीच महापालिकेने नाकारले आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या परवडेल असे नवे डिझाईन तयार करण्याच्या सूचना युनिटीला दिल्या आहेत.
युनिटी कन्सल्टंटने जॅकवेलच्या नव्या केलेल्या डिझाईनमध्ये आरसीसी वॉल आणि राफ्ट (फौंडेशन) यांच्यातच किमान १० कोटींची वाढ होत होती, तर त्याशिवाय स्टीलचेही दर वाढणार असल्याने जॅकवेलच्या नव्या डिझाईनमध्ये किमान १२ ते १५ कोटींची वाढ होणार होती, पण
नवे डिझाईन नाकारल्याने महापालिकेवर अतिरिक्त पडणारा बोजा वाचला आहे.