‘रिंगण’मधून अंधश्रध्दा निर्मूलनाचा जागर
By admin | Published: September 21, 2014 12:52 AM2014-09-21T00:52:43+5:302014-09-21T00:53:39+5:30
अंनिसचा उपक्रम : कोल्हापूरसह पुणे, सिंंधुदुर्ग, इस्लामपूर येथील
कोल्हापूर : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तेरा महिने उलटले तरी खुनी सापडलेले नाहीत. तरीही त्यांचे अंधश्रध्दा निर्मूलनाचे विचार संपलेले नाहीत ते पुढे नेण्याचे काम ‘अंनिस’तर्फे सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून रिंगण नाट्याच्या माध्यमातून आज, शनिवारी अंधश्रध्दा निर्मूलनाचा जागर करण्यात आला. कोल्हापूरसह पुणे, सिंधुदुर्ग, इस्लामपूर येथील गटांनी अंधश्रध्देशी निगडीत नाटक सादर केले.
महावीर महाविद्यालयात आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनात ‘अंनिस’तर्फे रिंगण नाट्य सादर झाले. त्याचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अशोक भोईटे,‘अंनिस’चे सरचिटणीस हमीद दाभोलकर, संजय बनसोडे, कार्याध्यक्ष अविनाश पाटील, योगेश कुदळे, प्राचार्य डॉ. एस. बी. कणसे, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे आदी उपस्थित होते.
यावेळी हमीद दाभोलकर, डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भाषणे झाली.
इस्लामपूर गटाने ‘सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ हे नाटक सादर करुन सॉक्रेटीस, संत तुकाराम व डॉ. दाभोलकर यांच्या सत्य विचाराला त्या त्या काळात दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्र मांडले. त्यानंतर इचलकरंजीच्या गटाने ‘आंतरधर्मीय विवाह’ या माध्यमातून हिंदू व मुस्लिम समाजातील तरुण तरुणीच्या विवाहामुळे झालेल्या विरोधाचे चित्र मांडले. कोल्हापूर गटाने ‘रुईचे लग्न’ मधून अविवाहित मुलांच्या मृत्युनंतर त्यांचा रुईच्या झाडाशी लावणाऱ्या विवाहास विरोध करणाऱ्या तरुणांचे वास्तव समोर आणले.
सिंधुदुर्ग-शिरगाव गटाने ‘भयमुक्त चित्त जेथे’ या नाटकातून लहान मुलांच्या मनातील भूत पिशाच्चाची भिती घरातील सुजणा व्यक्ती दूर करुन त्यांना आधार देणारे चित्र समोर आणले. यानंतर पुणे गटाने ‘ऐसे कैसे झालेभोंदू’ हे बुवाबाजीचा भांडा फोड करुन शहरातील उजळ माथ्याने होत असलेली अंधश्रध्दा मांडली.
कोल्हापूरच्या दुसऱ्या गटाने ‘न्याय हवा न्याय’ या माध्यमातून तेरा महिने उलटले तरी अद्याप दाभोलकरांचे मारे करी सापडत नाहीत. याबद्दल शासनाकडे न्याय मागणारी चतुसुत्री मांडण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)