लाठीकाठी, धनगरी ढोल, वारकरी ठरले आकर्षण ; हरे कृष्ण महामंत्राच्या गजरात जगन्नाथ रथयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 10:14 AM2020-01-31T10:14:58+5:302020-01-31T10:18:56+5:30
ऐतिहासिक दसरा चौकामध्ये महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, मुंबई येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान कृष्णानंद प्रभू यांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन झाले. आकर्षक अशा फुलांनी रथाची सजावट करण्यात आली होता.
कोल्हापूर : ‘हरे कृष्ण’ महामंत्राच्या गजरात गुरुवारी कोल्हापुरातून जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली. मर्दानी खेळ, धनगरी ढोल, वारकऱ्यांचा टाळ-मृदंग अशा पारंपरिक लोककला रथाचे वैशिष्ट्य ठरल्या. यावेळी इस्कॉन रथयात्रा समितीच्या सदस्यांसह भाविकांनी ऐतिहासिक दसरा चौक ते रंकाळा तलाव परिसरातील हरिओमनगर येथील मंदिरापर्यंत दोरखंडच्या साहाय्याने रथ ओढण्यात आला.
जगन्नाथपुरी (उडिसा) येथे जगन्नाथ रथयात्रेचा सर्वांत मोठा लोकोत्सव असतो. याच पार्श्वभूमीवर ‘इस्कॉन’चे संस्थापक प्रभुपाद यांनी १९६६ पासून जगभरात ही रथयात्रा सुरू केली. करवीरवासीयांवर कृपावर्षाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या वतीने (इस्कॉन) दरवर्षी कोल्हापुरातही भव्यदिव्य स्वरूपात जगन्नाथ यात्रा काढली जाते. यंदाची रथयात्रा गुरुवारी शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. ऐतिहासिक दसरा चौकामध्ये महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर, मुंबई येथील वरिष्ठ ब्रह्मचारी श्रीमान कृष्णानंद प्रभू यांच्या हस्ते रथयात्रेचे उद्घाटन झाले. आकर्षक अशा फुलांनी रथाची सजावट करण्यात आली होता. भक्तांनी ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या जयघोषात रथ ओढला. यावेळी करवीरनगरीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दसरा चौक येथून रथयात्रा लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे, शाहू टॉकीज, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, ताराबाई रोड, रंकाळा टॉवर, शालिनी पॅलेसमार्गे हरीओमनगर येथील ‘इस्कॉन’चे मंदिर अशी निघाली. यावेळी केशव विलास दास, शाम भक्त दास, जयानंद दास, धर्मशास्त्र दास, रूपविलास दास, प्रियसखा दास, अर्जुनप्राण दास उपस्थित होते.
पारंपरिक वाद्ये ठरली आकर्षण
मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकांसह लेझिम, धनगरी ढोल अशा पारंपरिक वाद्य रथयात्रेचे आकर्षण ठरले. कृष्ण, राधा, राम यांच्या वेशभूषेमध्ये बालचमू उपस्थित होते. रथयात्रेत भगवंताच्या लीला नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. बैलगाड्यांवर रथयात्रेबाबतची माहिती, देशविदेशांत होणाºया रथयात्रा यांचे फलक लावण्यात आले होते.