लोककलेच्या माध्यमातून मराठीचा जागर
By admin | Published: March 1, 2017 12:11 AM2017-03-01T00:11:42+5:302017-03-01T00:11:42+5:30
‘मराठी आमुचि मायबोली’ : संत ज्ञानेश्वर, तुकारामाचे अभंग, महाराष्ट्र दर्शनाची पालखी
कोल्हापूर : संत परंपरा, भारूड, पोवाडा, लावणी, संगीत नाट्यपदांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवित लोककलेच्या माध्यमातून मराठीचा जागर करण्यात आला. निमित्त होते ‘मराठी आमुचि मायबोली’ कार्यक्रमाचे.
केशवराव भोसले नाट्यगृहात शिवाजी विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी आमुचि मायबोली’ हा कार्यक्रम झाला. उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अभिनेता पुष्कर श्रोती यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रंसगी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, अन्य भाषा जरूर शिकावी; मात्र त्याचसोबत मराठी भाषेचा अभिमान बाळगणे गरजेचे आहे.
डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, मराठी भाषा वाहत्या नदीप्रमाणे आनंद देणारी आहे. तिचा प्रचार व प्रसार युवा पिढीने केला पाहिजे.
कार्यक्रमाच्या प्रारंभीच महाराष्ट्र दर्शन घडविणाऱ्या पालखी सोहळ्याने झाली. त्यानंतर धनंजय म्हसकर आणि सुचित्रा भागवत, सोनाली कर्णिक यांनी सादर केलेल्या रूणझुण रूणझुण रे भ्रमरा, रंगा येई हो, वृक्षवल्ली आम्हा सोया, खेळ मांडियेला या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांचे अभंगाने सर्वांना तल्लिन केले. पाठोपाठ उदेश उमाप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खान वधाचे वर्णन पोवाड्यातून सादर केले. त्यानंतर बहिणाबाई, शांता शेळके यांच्या कविता, मंगळागौर, लग्नगीत, भोंडला, संगीत नाट्यपदांसह विद्रोही साहित्य, मुंबईची लावणी, विनोदी प्रहसन, स्वातंत्र्य संग्रामाचे सादरीकरण केले.
कविता व नाट्यवाचन पुष्कर श्रोती यांनी केले. भारूड निरंजन भाकरे यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे दिग्दर्शन सुभाष नकाशे, लेखन अजित परब व मंदार खराडे, संगीत संयोजन व गायक अजित परब, नृत्यदिग्दर्शन मीनल भिके, तर निर्मिती सूत्रधार सुनील कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी विभागीय सहसंचालक डॉ. अजय साळी, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी शिवाजी विद्यापीठ, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘मराठी आमुचि मायबोली’ या कार्यक्रमात कलाकारांनी पालखी सोहळ्यातून महाराष्ट्राचे दर्शन घडविले.