गुळाच्या दरात महिन्यात हजार रुपयांची घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:49 AM2020-12-05T04:49:09+5:302020-12-05T04:49:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : यंदा उत्तर प्रदेश, कर्नाटकसह सर्वच राज्यांत उसाचे बंपर पीक असल्याने गुळाचे उत्पादनही वाढले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदा उत्तर प्रदेश, कर्नाटकसह सर्वच राज्यांत उसाचे बंपर पीक असल्याने गुळाचे उत्पादनही वाढले आहे. त्याचा परिणाम गुजरात, राजस्थान मार्केेटमध्ये गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणाम कोल्हापूर मार्केटवर दिसत असून, महिन्याभरात दरात एक हजारांची घसरण झाली आहे.
कोल्हापूरसह राज्यात यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाचे पीक चांगले आहे. त्यामुळे साखर व गुळाचे उत्पादनही मुबलक होणार हे निश्चित आहे. लॉकडाऊनमुळे कोल्डस्टोरेजमधील गूळ संपल्याने हंगामाच्या सुरुवातीला गुळाला चांगली मागणी होती. त्यामुळे दरही चढा राहिला होता. किमान ४५०० ते कमाल ५५०० रुपये क्विंटल दर होता. मात्र, हंगाम पुढे जाईल तशी दरात घसरण होत गेली. गेली दोन दिवस एक किलो बॉक्सचा दर सरासरी ३४०० रुपये क्विंटलपर्यंत आला आहे. पाच व दहा किलो रव्यांचा दर सरासरी ४ हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे.
उसाचे उत्पादन अधिक असल्याने यंदा गूळही मुबलक होणार यांचा अंदाज व्यापाऱ्यांना आहे. त्यात उत्तर प्रदेश, कर्नाटकातून गुजरात व राजस्थानमध्ये गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोल्हापूर मार्केटवर परिणाम झाला असून, दरावर परिणाम झाला आहे.
गुळाची निर्यातही वाढणार
‘कोल्हापुरी’ गुळाला अमेरिका, लंडनसह आखाती देशात मागणी आहे. साधारणत: हंगामात एक टन गूळ निर्यात होतो. यंदा दर कमी असल्याने निर्यातही वाढेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
साखरविरहित गुळाला मॉलमध्ये मागणी
राज्यातील मॉलमध्ये साखरविरहित गुळाला चांगली मागणी आहे. नियमित गुळापेक्षा क्विंटलमागे दोनशे रुपये जादा दर मिळतो. या गूळ निर्मितीकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे.
बाजार समितीतील रोजची गूळ आवक व दरदाम असा-
आवक रवे सरासरी दर रुपयात
२५५३९ ४०००
१३४० बॉक्स ३४००
- राजाराम लोंढे