मार्केट यार्डमधील गूळ चोरटा निघाला चहा विक्रेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:49+5:302020-12-08T04:21:49+5:30
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डामध्ये व्यापाऱ्यांनी सौदे करून ठेवलेले गुळाचे रवे चोरणाऱ्या युवकास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संतोष ...
कोल्हापूर : शाहू मार्केट यार्डामध्ये व्यापाऱ्यांनी सौदे करून ठेवलेले गुळाचे रवे चोरणाऱ्या युवकास शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संतोष कानजी ठाकूर (वय २९, रा. विक्रमनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून २४ हजार रुपये किमतीचे एकूण ६९ रवे जप्त केले. चौकशीत चोरटा चहा विक्रेता असल्याचे स्पष्ट झाले.
दि. २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान तीन दिवस मार्केट यार्डला सुट्टी असल्याने व्यवहार बंद होते. बंद कालावधीत चोरट्याने पाच व्यापाऱ्यांचे एकूण १४०० किलो असे १४० गुळाचे रवे चोरले. शाहूपुरी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला. विक्रमनगरातील ठाकूर या चोरट्याने चोरी केल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली, त्यानुसार त्याच्या घरात छापा टाकून चोरीचे ३९ गुळाचे रवे ताब्यात घेतले. सखोल चौकशी करता त्याने विक्री केलेले आणखी ३० गुळाचे रवेे असा एकूण सुमारे २४ हजार १५० रुपये किमतीचा गूळ जप्त केला. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.
गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सचिन पांढरे, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, हवालदार अशोक पाटील, राजेश बरगाले, पो. ना. युवराज पाटील, प्रशांत घोलप, किरण वावरे, प्रथमेश पाटील, अनिल पाटील, विशाल चौगले, दिगंबर पाटील, दिग्विजय चौगले, राहुल कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यावेळी अनेक फुटेजमध्ये एक मुलगा रोज मध्यरात्री ताडपत्रीने झाकलेले गुळाचे रवे उघडून ते खांद्यावरून नेताना दिसून आला. त्या फुटेजच्या आधारे त्यांनी चोरट्याचा माग काढला. चोरटा यापूर्वी परिसरात चहा विक्री करत होता. आता व्यवसाय बंद करून परिसरात फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले होते.
फोटो नं. ०६१२२०२०-कोल- संतोष ठाकूर (गूळ चोरी)
फोटो नं. ०६१२२०२०-कोल-गूळ चोरी०१
ओळ : मार्केट यार्डमधील गूळ शाहूपुरी पोलिसांनी चोरट्याच्या घरी छापा टाकून जप्त केला.
(तानाजी)