शाहिरी पोवाड्यांतून शिवरायांच्या विचारांचा जागर
By Admin | Published: April 20, 2015 12:17 AM2015-04-20T00:17:16+5:302015-04-20T00:21:39+5:30
आपल्या घराकडे व कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तववादी चित्र त्यांनी आपल्या शाहिरीतून यावेळी मांडले.
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या राज्यात परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. कारण शिक्षाच तशी जरबेची होती, पण आता दररोज वर्तमानपत्रांची पाने उलगडल्यावर बलात्काराच्या घटना दिसतात. त्याला कारण गुन्हेगाराला कुणाचाच धाक राहिलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा शिवशाहीच्या विचारांचा जागर होण्याची गरज आहे, असे आवाहन शाहिरांनी आपल्या पोवाड्यांतून रविवारी सायंकाळी केले. ऊर्जामयी पोवाड्यांतून शिवरायांच्या विचारांच्या जागराने शिवभक्तांमध्ये रोमांच उभे राहिले. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मिरजकर तिकटी येथे मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळातर्फे शिवजयंती उत्सवानिमित्त ज्येष्ठ शाहीर शंकर पाटील (दिंडनेर्ली), शिवशाहीर निवृत्ती कुंभार (बामणी) व सहकाऱ्यांचा शाहिरी पोवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रमुख पाहुणे बाबासाहेब देशमुख (सांगोला) यांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महापालिका स्थायी समिती सभापती आदिल फरास, बाबूराव चव्हाण, निवासराव साळोखे, अशोक पोवार, जयकुमार शिंदे, राजेंद्र ठोंबरे, प्रवीण मोहिते, आदींची प्रमुख उपस्थिती होती.ज्येष्ठ शाहीर शंकर पाटील यांच्या पोवाड्यांतून छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर करीत शिवरायांमुळेच शाहिरांच्या डफाला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाल्याचे सांगितले. जगात अनेक राजे होऊन गेले, परंतु शिवराय हे एकमेव राजे होते की ज्यांना ‘छत्रपती’ ही पदवी आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठीच शाहिरी जन्माला आल्याचे सांगून शाहीर पाटील यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, नेताजी बोस यांची गौरवगाथा आपल्या शाहिरी पोवाड्यांतून मांडली.
शाहीर निवृत्ती कुंभार यांनी स्वर्गीय शाहीर पिराजीराव सरनाईक यांचा ‘स्वराज्याचे तोरण’ हा पोवाडा सादर करून उपस्थित शिवभक्तांच्या अंगावर रोमांच उभे केले. सध्याच्या महिला या टी.व्ही. मालिकांमध्ये इतक्या गुंतल्या गेल्या आहेत, की त्यांचे आपल्या घराकडे व कुटुंबांकडे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तववादी चित्र त्यांनी आपल्या शाहिरीतून यावेळी मांडले. (प्रतिनिधी)