‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर अखंड गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:10 PM2019-05-08T12:10:55+5:302019-05-08T12:15:21+5:30

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की ऽऽ जय ’ ‘हर हर ऽऽ महादेव...’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, धनगरी ...

'Jai Bhavani Jay Shivaji' alarm alarm of alarm | ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर अखंड गजर

कोल्हापुरात मंगळवारी संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीने आयोजित शिवजयंती मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराज, मावळे यांची वेशभूषा करून तरुण सहभागी झाले होते.(छाया : दीपक जाधव)

googlenewsNext
ठळक मुद्दे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूकसंयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संस्थेच्या वतीने सजीव देखावे

कोल्हापूर : ‘छत्रपती शिवाजी महाराज की ऽऽ जय ’ ‘हर हर ऽऽ महादेव...’, ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर, धनगरी ढोल, लेझीम, झांजपथक, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, पंचगंगा प्रदूषणमुक्ती, लेक वाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांसह बालशिवाजीचे सजीव देखावे अशा उत्साही वातावरणात शिवजयंतीनिमित्त मंगळवारी संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम संस्थेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली.

जुना बुधवार पेठ येथे या मिरवणुकीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापौर सरिता मोरे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, धनंजय सावंत यांच्यासह संयुक्त जुना बुधवार पेठेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या सुरुवातीला आकर्षक लेसर लाईट होते. त्यापाठोपाठ आर्यन ढोलपथक होते. पाठोपाठ रिक्षांवर पंचगंगा प्रदूषण, भूकबळी, राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा, बळिराजा, पाणी वाचवा, लेक वाचवा, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी यांच्याबद्दल सचित्र व प्रबोधनात्मक फलक लावण्यात आले होते. त्यानंतर बाल शिवाजी यांची वेशभूषा परिधान करून बालचमू ट्रॉलीत बसले होते.

सुप्रभात ब्रॅँड, त्यापाठोपाठ मर्दानी खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखविण्यात येत होते. तसेच कागल, माद्याळ येथील श्रीराम मंडळाचे लेझीम पथक व हणमंतवाडी येथील श्री बिरदेव तरुण मंडळाच्या ढोलपथकाने मिरवणुकीत उत्साहाचे रंग भरले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान करून युवक घोड्यावर आरूढ झाले होते. सगळ्यांत शेवटी सिंहासनारूढ छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा होता.

भगवे फेटे, पांढऱ्या रंगाचे झब्बे अशी पारंपरिक वेशभूषा केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले. ही मिरवणूक महानगरपालिका, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे जुना बुधवार पेठ येथे सांगता झाली. ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

या मिरवणुकीत मुलींचे मर्दानी खेळ, लेझीम पथकांचा समावेश होता. याशिवाय मिरवणुकीत महिला पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या.


 

 

 

Web Title: 'Jai Bhavani Jay Shivaji' alarm alarm of alarm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.