जय स्वच्छता ! जय समृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:49 AM2019-01-09T00:49:25+5:302019-01-09T00:51:52+5:30

खरं तर ‘स्वच्छता ही स्वातंत्र्याइतकीच महत्त्वाची आहे’ असं महात्मा गांधीजींना त्यावेळी का वाटत होतं, याची जाणीव आजची सद्य:परिस्थिती पाहिल्यानंतर शंभर टक्के होते.

Jai cleanliness! Jai Samriddhi | जय स्वच्छता ! जय समृद्धी

जय स्वच्छता ! जय समृद्धी

googlenewsNext

- भारत पाटील
खरं तर ‘स्वच्छता ही स्वातंत्र्याइतकीच महत्त्वाची आहे’ असं महात्मा गांधीजींना त्यावेळी का वाटत होतं, याची जाणीव आजची सद्य:परिस्थिती पाहिल्यानंतर शंभर टक्के होते. अस्वच्छतेमुळे होणारे घातक दुष्परिणाम यामुळे आपण गावाचे बिघडलेले आरोग्य पाहतो. अत्यंत भयानक स्थिती पाहायला मिळते. स्वच्छता हा संस्कार आहे. शिस्तप्रिय जीवनशैलीचा भाग आहे. कोणत्याही समृद्ध गावांची, शहरांची व समाजाची विकासाची कल्पना करताना स्वच्छता हा विकासातील पहिला टप्पा आहे. स्वच्छतेशिवाय समृद्धी येऊच शकत नाही. यामध्ये घर स्वच्छता, परिसर स्वच्छता, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, स्वच्छ पाणी, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, मलमूत्र व्यवस्थापन या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत; परंतु आपण मात्र या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. आपलं घर आपण स्वच्छ आरशासारखं लख्ख ठेवतोे; पण बाहेर मात्र परिसर अगदी उकिरडा करतो. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करणे, उघड्यावरील हागणदारी, कचरा कुठेही फेकणे, तंबाखू-गुटखा खाऊन कुठेही पिचकारी मारणे, बिडी, सिगारेट ओढून थोटके कुठेही फेकणे, तुंबलेली गटारे, साचलेले उकिरडे, प्लास्टिक व थर्माकोल यांचे ढीग असं आपल्या गावचं चित्र आपणच केलेलं आहे. घरात आपण असं कुठे पण कचरा फेकतो का? कुठेही थुंकतो का? आपण कचरा करावा, तो कुठेही फेकावा आणि तो दुसऱ्या कोणी तरी काढावा, अशीच सध्या आपल्या सर्वांची विकृत मानसिकता झाली आहे. यामुळे आपली गावं अस्वच्छ व उकिरड्यासारखी आपणच बनविली आहेत.

आपल्या गल्ल्या, तलाव, ओढे, खुल्या जागा म्हणजे कचरा व घाणीचे ढीग आपण केले आहेत. दुर्गंधी, घाणेरडा वास यामुळे गावांचे आरोग्य मात्र पूर्णपणे बिघडले आहे. गावांत रोगराई व विविध आजारांचे थैमान बघायला मिळते. अस्वच्छता व या घाणीच्या साम्राज्यातून जीवजंतू, जिवाणू-विषाणू, डास, माशा निर्माण होतात व आपले आरोग्य बिघडवितात. आपलं रक्त शोषून घेतात. आपली मुलं रोगी बनतात. आपलं आयुष्यमान कमी करतात. एखादी साथ आली की, घरोघरी आजारी पेशंट यामुळे दवाखान्यात रीघ लागलेली आपण पाहतो. कुपोषण, अ‍ॅनिमिया, साथीचे रोग यामध्ये हिवताप, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुन्या, स्वाइन फ्लू, कावीळ, ताप, ज्वर, डायरिया अशा अनेक रोगांमुळे दरवर्षी लाखो लोक मरण पावतात. अगदी किड्यामुंगीसारखी माणसं आजारी पडतात व मरतात. जागतिक आरोग्य संघटना व ४ल्ल्र२ीा पण याबाबतीत आपणाला सतत मदत करीत आहे. जागतिक ह्युमन इंडेक्समध्ये आपला जगात १३२ वा नंबर आहे. तसं हे आपणाला न शोभणारं आहे.

मानवी जीवनमूल्यांच्या बाबतीत आपल्या गावात अजूनही कसलीही महिती नाही. आपली व आपल्या तरुण पिढीची प्रतिकारशक्ती हा अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. आपली पूर्वीची पिढी शंभर वर्षे जगत होती. मनाने, शरीराने मजबूत होती. आज कित्येक घरांतील तरणीताठी पोरंसुद्धा या भयानक आजारात मरण पावली आहेत. तरीदेखील आपण याविषयी गंभीर विचार व कृती करीत नाही. ही आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप काळजीची व दयनीय अवस्था आहे. संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपलं सगळं आयुष्य प्रबोधन करण्यात घालिवले. ‘जैसे आपण स्नान करावे। तैसेची निर्मल ग्राम ठेवावे’ हा संदेश त्यांनी आपणाला दिला. स्वच्छतेशिवाय आपणाला समृद्धी नाही, असंही गाडगेबाबांनी स्वत:च्या आचरणातून व कृतीतून समाजाचे प्रबोधन केले. हाती झाडू घेऊन गावं झाडून काढली. माणसांची मनं पण साफ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीदेखील आपण शिकली- सवरलेली माणसं याबाबतीत मात्र अजूनही विचार करीत नाही. आपण परदेशात जाऊन आलो की, त्या गावांची व शहरांची स्वच्छता, हिरवाई, शिस्त यांचे गोडवे गातो; पण हे सगळं तेथील लोकांनी कष्टाने निर्माण केलं आहे. त्यांच्या शिस्तप्रिय जीवनशैलीतून व श्रमातून निर्माण झाले आहे, हे मात्र विसरून जातो.

आपलं शासनही प्रयत्न करीत आहे. कै. आर. आर. पाटील यांचं योगदानही फार महत्त्वाचे आहे. त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केलं होतं. राज्यातील अनेक गावे या अभियानात सहभागी झाल्यामुळे गावांमध्ये स्वच्छता चळवळ सुरू झाली. या चळवळीमुळे लोक श्रमदान करून आपलं गावं स्वच्छ करू लागले; परंतु हे काही गावांनीच करून दाखविले. यातूनच निर्मलग्राम, पर्यावरण संतुलित ग्राम, स्वच्छ भारत मिशन, असे अनेक कार्यक्रम सुरू झाले आहेत.


कोणत्याही समृद्ध गावांची, शहरांची व समाजाची विकासाची कल्पना करताना स्वच्छता हा विकासातील पहिला टप्पा आहे. स्वच्छतेशिवाय समृद्धी येऊच शकत नाही.
संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपलं सगळं आयुष्य प्रबोधन करण्यात घालिवले. ‘जैसे आपण स्नान करावे। तैसेची निर्मल ग्राम ठेवावे’ हा संदेश त्यांनी आपणाला दिला.

(लेखक ग्रामविकास व व्यसनमुक्ती चळवळीतील बिनीचे कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Jai cleanliness! Jai Samriddhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.