Ganeshotsav : यंदा अवकाशात झेपावणार ‘जय शिवराय’चा ‘उपग्रह‘
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 03:34 PM2018-09-05T15:34:19+5:302018-09-05T15:38:29+5:30
गणेशोत्सव म्हटले की, तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी उद्यमनगरकडे आबालवृद्ध गणेशभक्तांचे आपोआप पाय वळतात. त्यात जय शिवराय मित्रमंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. यंदा हीच परंपरा कायम राखत या मंडळाने ‘इस्रो’चे ‘स्पेस स्टेशन’ व त्यातून आकाशात ३० फुटांपर्यंत झेपावणारा ‘उपग्रह’ याची प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे.
कोल्हापूर : गणेशोत्सव म्हटले की, तांत्रिक देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवाजी उद्यमनगरकडे आबालवृद्ध गणेशभक्तांचे आपोआप पाय वळतात. त्यात जय शिवराय मित्रमंडळाने आपले वेगळेपण जपले आहे. यंदा हीच परंपरा कायम राखत या मंडळाने ‘इस्रो’चे ‘स्पेस स्टेशन’ व त्यातून आकाशात ३० फुटांपर्यंत झेपावणारा ‘उपग्रह’ याची प्रतिकृती साकारण्यास सुरुवात केली आहे.
तेहतीस वर्षांपूर्वी बाल मंडळ म्हणून स्थापन झालेल्या या मंडळाने गेल्या दहा वर्षांपासून सहजरीत्या ने-आण करण्यास सोप्या जाव्यात, या उद्देशाने साडेपाच फूट उंचीच्या गणेशमूर्ती स्थापन करण्यास सुरुवात केली. त्यातून पर्यावरणाचा समतोल व सामाजिक बांधीलकीची जाणीव या मंडळाच्या कार्यकर्त्यांना झाली.
त्यातून तांत्रिक बाबींवर आधारित ‘शेतकरी राजा गणेश’, कारगिलमधील सैनिकांना समर्पित सैनिक रूपातील गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक वृक्षातील गणेश, सर्व शिक्षा अभियानातील गणेश, ‘सेव्ह द टायगर, सेव्ह द जंगल’ पारंपरिक ढोल-ताशा वाजविणारा गणेशमूर्ती साकारल्या. तलावात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी मंडळाने गेल्या वर्षीपासून फायबर, गवत, कापड, लोखंड यांपासून इको-फ्रेंडली गणेशमूर्ती साकारली.
मागील वर्षी भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’चा तांत्रिक देखावाही सादर केला होता. हीच परंपरा कायम राखत मंडळाने यंदा ‘इस्रो’च्या श्रीहरिकोटा येथील उपग्रह सोडणाऱ्या स्पेस स्टेशनची प्रतिकृती साकारण्यास प्रारंभ केला आहे. या देखाव्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सागर जाधव, प्रशांत जाधव, नीलेश देसाई, प्रतापसिंह देसाई, रवींद्र सुतार, शंतनू जाधव हे परिश्रम करीत आहेत.
वैज्ञानिक खुद्द गणराय
यात मंडळाने दोन फूट रुंद व ११ फूट उंच असा ३० फुटांपर्यंत आकाशात झेपावणारा उपग्रह आणि भारतीय सैन्यदलासाठी या अवकाशयान केंद्राचा होणारा उपयोग याबद्दलचा हा देखावा उभारण्यात येणार आहे. या केंद्राचे नियंत्रण करणारे वैज्ञानिक खुद्द गणराय असून, त्यांना मदतनीस म्हणून काम करणारा मूषक असे या देखाव्याचे स्वरूप आहे.
विकसित देशांकडे मार्गस्थ असलेल्या आपल्या देशात श्रीहरिकोटा येथील ‘इस्रो’चे अवकाश यान केंद्र हे भारताबरोबरच नेपाळ, श्रीलंका, भूतान अशा शेजारील देशांसाठीही बहूपयोगी ठरत आहे. यासह भारतीय सैन्यदलासही हे केंद्र वरदान ठरत आहे. म्हणून आम्ही यंदा हा देखावा साकारत आहोत.
- सागर जाधव,
अध्यक्ष, जय शिवराय मित्र मंडळ