कारागृहातील मोबाईलची चौकशी : स्वाती साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:09 AM2018-11-29T00:09:04+5:302018-11-29T00:09:24+5:30
कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील संशयित नराधम संतोष पोळ याने कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल कसा नेला, पोळ हा ...
कोल्हापूर : सातारा जिल्ह्यातील वाई हत्याकांडातील संशयित नराधम संतोष पोळ याने कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल कसा नेला, पोळ हा कारागृहात सात वेळा व्हिडीओ करतो, त्याच्याकडे एकाही सुरक्षारक्षकाचे लक्ष कसे नाही याची कसून चौकशी सुरू असून, कारागृहातील दहा कर्मचाऱ्यांवर संशय असल्याची माहिती कारागृह पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पोळ बरॅकमध्ये हातामध्ये घेऊन फिरत असलेले पिस्तूल बनावट आहे. ते साबणापासून बनविले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोळ पिस्तूल दाखवीत असल्याचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली. त्याची दखल घेऊन उपमहानिरीक्षक साठे तातडीने कोल्हापुरात आल्या. त्या म्हणाल्या, ‘साबणापासून केलेले पिस्तूल व्हिडिओ केल्यानंतर पोळ यानेच ते नष्ट करून टाकले. कारागृह प्रशासनाला बदनाम करण्यासाठी त्याने हे षड्यंत्र रचले. त्याला मोबाईल देण्यासाठी सेंट्रिंग कामगाराच्या खुनातील संशयित आरोपी अमोल पवार याने मदत केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. या दोघांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल.’
कळंबा कारागृहात अधीक्षक शरद शेळके यांच्याकडून त्यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन, संशयित पोळ याच्याकडे पाच तास कसून चौकशी केली. त्याने ते पिस्तूल आपल्या सहकाºयाला दाखविले होते. त्या सहकाºयाकडेही साठे यांनी चौकशी केली. पोळला अंडा बरॅकमध्ये ठेवले आहे. पुणे येथील कारागृह दक्षता पथकाकडून त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू होती.
साबणाचे पिस्तूल
राज्यातील सर्व कारागृहांतील कैदी मनोरंजनाचे कार्यक्रम तयार करून ते विधिमंडळ अधिवेशनाच्या अगोदर मुख्यमंत्र्यांसमोर सादर करीत असतात. ठाणे येथे २७ नोव्हेंबरला ‘बंदी रजनी’चा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी कैद्यांनी लाकडी पुठ्ठे, साबणापासून पिस्तूल, एके ५६ अशी हत्यारे तयार करून देशभक्तिपर गीत व नृत्ये तयार केली आहेत. कार्यक्रमासाठी कारागृहातील दहा कैदी ठाण्याला कार्यक्रमासाठी गेले आहेत. साबणापासून बनविलेले पिस्तूल पोळ याने चोरून आपल्याजवळ ठेवले होते. त्याचा व्हिडीओ बनवून ते पिस्तूल नष्ट केले आहे, अशी माहिती उपमहानिरीक्षक साठे यांनी दिली.
अमोल पवारने दिला मोबाईल
विम्याच्या ३५ कोटी रुपयांचा लाभ मिळविण्याच्या उद्देशाने स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी सेंट्रिंग कामगार रमेश कृष्णाप्पा नाईक (रा. गडहिंग्लज, मूळ रा. विजापूर) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी अमोल जयवंत पवार याला अटक केली आहे. तो कळंबा कारागृहात बंदिस्त आहेत. त्याची कारागृहातील रुग्णालयात संतोष पोळ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांना भेटत होते. पवारनेच पोळला मोबाईल उपलब्ध करून दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कारागृहात रोज भाजीपाला, विविध साहित्य, कामानिमित्त येणाºया व्यक्ती, कर्मचाºयांची ये-जा असते. त्यांची प्रवेशद्वारावर झडती घेतली जाते. काही वेळा कारागृहाच्या भिंतींवरून मोबाईल आतमध्ये फेकले जातात. त्यामुळे कारागृहात मोबाईल आला कसा, याचा शोध घेतला जात आहे.
संतोष पोळची प्रशासनाला धमकी
पोळ याच्याकडील मोबाईल अद्याप कारागृह प्रशासनाच्या हाती लागलेला नाही. त्याला विचारणा केली असता पिस्तूल खरे असून त्याच्यासह मोबाईल सुरक्षितस्थळी ठेवला आहे. न्यायालयात योग्य वेळी ते हजर करीन, अशी धमकी त्याने प्रशासनालाच दिली आहे.