Jain Monk Tarun Sagar : कोल्हापुरात तरुणसागर महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:21 PM2018-09-03T15:21:22+5:302018-09-03T15:28:00+5:30
क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.
कोल्हापूर : क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांचे कोल्हापूरच्या भूमीतही चिरतरुण वास्तव्य राहण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भगवान महावीर अध्यासन केंद्रात त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, अशी भावना क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर महाराज चातुर्मास समिती व समस्त जैन बांधवांतर्फे व्यक्त करण्यात आली.
शुक्रवार पेठेतील जैन मठात राष्ट्रसंत तरुणसागर महाराज यांना ‘विनयांजली’ अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत उपस्थितांमधून असा सूर उमटला. सभेसाठी डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी विशेष उपस्थित होते.
भारतीय जैन संघाचे पारस ओसवाल म्हणाले, महाराजांनी श्वेतांबर व दिगंबर या दोन पंथांच्या लोकांना एकत्र आणले. राष्ट्रीय जैन मायनॉरिटीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराजांनी केवळ जैन धर्मियांनाच नव्हे, तर बहुजन समाजालाही प्रेरणा देणारे कार्य केले आहे.|
पद्मिनी कापसे म्हणाल्या, आपल्या संपूर्ण प्रवचनात महिलांचा सन्मान होईल, अशी शिकवण महाराजांनी दिली. आई-वडील हे ईश्वरासमान आहेत. घरातून बाहेर पडताना त्यांना नतमस्तक झाले पाहिजे, असे सांगणारे ते एकमात्र तरुणसागर महाराज होते.
पद्माकर कापसे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू असणाऱ्या भगवान महावीर अध्यासन केंद्रांतर्गत मुनीश्री तरुणसागर महाराजांचे चिरंतन स्मारक व्हावे. त्यामध्ये महाराजांच्या संपूर्ण शिकवणीचा अभ्यास, ग्रंथालय, शिष्यवृत्ती, आदींचा समावेश असावा, अशी भावना व्यक्त केली. त्यास सर्व उपस्थितांनी हात वर करून संमती दिली.
यावेळी मेजर एन. एन. पाटील, अॅड. महावीर बिंदगे, प्राचार्य श्रीधर हेरवाडे, आदींनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सुधीर अलगौडर, सुनील पाटील, संजय आडके, अशोक रोटे, अमृत वणकुद्रे, सुशांत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
णमोकार महामंत्रातून विनयांजली
राष्ट्रसंत मुनीश्री तरुणसागर महाराजांनी जैन समाजातील मरगळ दूर केली. नव्या क्रांतीची जागृती केली. त्यातून जैनधर्मीयच नव्हे तर सर्व धर्मियांमध्ये त्यांनी चैतन्य निर्माण केले. त्यांचे विचार समाजाने पुढे नेले पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मीसेन महास्वामींनी आपल्या आशीर्वचनात केले. यावेळी उपस्थितांनी स्वर्गस्थ महाराजांना णमोकार महामंत्रातून विनयांजली अर्पण केली.