आर्थिक व्यवहारातून जैन मुनींची हत्या, एसपी संजीव पाटीलांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 02:17 PM2023-07-08T14:17:56+5:302023-07-08T14:19:22+5:30
पैसे परत मागितल्याने आपण स्वामीजींचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली
प्रकाश बेळगोजी
बेळगाव: दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या हिरेकोडी आश्रमाचे आचार्य प. पु. श्री कामकुमार नंदी महाराज यांची आर्थिक व्यवहारातून रायबाग तालुक्यातील कटकभावी गावात हत्या झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिघांना अटक झाली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी दिली.
पैसे परत मागितल्याने आपण स्वामीजींचा खून केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. स्वामीजी बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार भक्तांनी केली होती. तपासादरम्यान आश्रमात कोण-कोण आले-गेले? याची चौकशी करण्यात आली. स्वामीजींना ओळखणाऱ्या एका व्यक्तीची आम्ही चौकशी केली असता स्वामींना आश्रमात मारून मृतदेह इतरत्र टाकल्याची माहिती त्याने दिली. मात्र त्या माहिती तफावत होती. आरोपीनी प्रारंभी स्वामीजींचा मृतदेह कट्टनभावी येथील एका निरुपयोगी विहिरीत टाकल्याचे सांगितले. त्यानुसार तपास केला असता त्या ठिकाणी मृतदेह आढळला नाही.
त्यानंतर आरोपींनी आपला जबाब बदलताना स्वामीजींच्या मृतदेहाची नदीमध्ये विल्हेवाट लावल्याचे सांगितले. त्यानुसार सध्या मृतदेहाचा शोध घेतला जात असून याप्रकरणी व्यापक तपास मोहीम हाती घेऊन पुरावे गोळा केले जात आहेत, असेही जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील यांनी स्पष्ट केले. आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज गेल्या 15 वर्षांपासून नंदीपर्वत, हिरेकोडी येथील जैन बस्तीमध्ये राहत होते. गेल्या बुधवारी आपण राहत असलेल्या खोलीत पिंची, कमंडल आणि मोबाईल सोडून ते बेपत्ता झाले होते.