जैनापुरात सांडपाणी प्रश्न वादाच्या भोवऱ्यात
By admin | Published: June 2, 2017 12:43 AM2017-06-02T00:43:34+5:302017-06-02T00:43:34+5:30
जैनापुरात सांडपाणी प्रश्न वादाच्या भोवऱ्यात
संतोष बामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : शिरोळ तालुक्यातील दुष्काळी गाव म्हणून जैनापूर गावाची ओळख आहे. हे गाव लहान टेकडीवर वसलेले असून, गावातील सर्व सांडपाणी ग्रामपंचायत कार्यालय समोरून जाते. मात्र, सांडपाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांनी बांध घालून पाणी अडविले आहे, तर रेल्वे प्रशासनाच्या मर्यादेमुळे ग्रामपंचायतीला अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षामुळे जैनापुरात तिहेरी सांडपाणी प्रश्न वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कमी आणेवारीमुळे गावाचा महसूल अगदी कमी प्रमाणात ग्रामपंचायतीला मिळतो. यामध्ये स्थानिक कामाची पूर्तता ग्रामपंचायतीकडून होत नाही. तसेच गेल्या दोन वर्षांपासून जैनापूर गावातील सांडपाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी गावातील सर्व पाणी चिपरी रस्त्यालगत एका शेतात जात होते. मात्र, ते शेत पिकाऊ केल्याने सांडपाणी मार्ग बंद झाला आहे, तर गावाची भौगोलिक परिस्थिती पाहता गावातील सर्व सांडपाणी थांबून घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
जैनापूर गावालगत रेल्वे रूळ असून, रुळालगत ओढा आहे. हे सांडपाणी ओढ्यात सोडावयाचे झाले तर रेल्वे प्रशासनाला लाखो रुपये रक्कम भरून तो परवाना घ्यावा लागतो. मात्र, जैनापूर ग्रामपंचायतीकडे आर्थिक बाजू खचलेली असल्याने तो खर्च आवाक्याबाहेरचा आहे. सध्या गावातील पाणी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरून दलित वस्तीत जात असून, येथील नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे.
तर सध्या शेतकरी, रेल्वे प्रशासन, जिल्हा परिषद विभागाने तत्काळ लक्ष देऊन सांडपाणी प्रश्न सोडवावा अन्यथा जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.