जयसिंगपुरात उड्डाणपूल पुन्हा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 11:32 PM2016-03-29T23:32:02+5:302016-03-30T00:02:12+5:30
नागरिकांची मागणी : चौपदरीकरणांतर्गत उड्डाणपूल रद्द; रस्ता ओलांडताना नागरिकांचा जीव मुठीत
संदीप बावचे -- जयसिंगपूर --जयसिंगपुरातील उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने शहरात हेरवाडे कॉलनीपासून पायोस हॉस्पिटलपर्यंत पिलरवरील उड्डाण पुलाची मागणी केली आहे़ यापूर्वी उड्डाणपुलावरून अनेकवेळा चर्चेचे गुऱ्हाळ रंगले होते़ चौपदरीकरणांतर्गत उड्डाणपूल रद्द करण्यात आला होता़ आता पुन्हा उड्डाणपुलाच्या मागणीने उचल खाल्ली आहे़
सांगली-कोल्हापूर चौपदरीकरणांतर्गत जयसिंगपूर शहरातून दुपदरी आणि तमदलगे बायपास मार्गे दुपदरी असा चौपदरीकरणाचा रस्ता होत आहे़ सन २००८ मध्ये पोस्ट कार्यालयापासून महावितरण कार्यालयापर्यंत उड्डाणपुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला होता़ चौपदरीकरणाच्या मंजुरीनंतर उड्डाणपुलाबाबत उत्सुकता लागून राहिली होती़ मात्र, शहराच्या अस्तित्वाला छेद मिळून क्रांती चौक उड्डाणपुलाच्या तळात जाणार, शिवाय मार्गावरील व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार, याप्रश्नी उड्डाणपूल विरोधी कृती समितीने नगरपालिकेकडे मागणी करून उड्डाणपूल रद्दबाबतचा ठराव करण्याची मागणी केली गेली़ पालिकेनेही उड्डाणपूल रद्द करण्याचा ठराव मंजूर केला होता़
जयसिंगपूर शहरात सांगली-कोल्हापूर महामार्गाला तेरा छेद रस्ते असल्यामुळे सध्या होत असलेल्या वाहतुकीमुळे जनतारा हायस्कूल, पोस्ट कार्यालय, जयसिंगपूर न्यायालय, नांदणी रस्ता, नगरपालिका रस्ता, क्रांती चौक, झेले चित्रमंदिर या मुख्य ठिकाणी रस्ता ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते़ यामुळे हेरवाडे कॉलनी ते पायोस हॉस्पिटल या दरम्यान पिलरवरील उड्डाणपूल करावा, अशी मागणी टोलविरोधी कृती समितीने आता लावून धरली आहे़ उड्डाणपुलावरून विविध मतप्रवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही़
गेल्या वर्षी जयसिंगपूर येथे बैठक घेऊन शहरातील प्रश्नाबाबत नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या़ यावेळी शहरात पिलरवरील उड्डाणपूल करावा, अशी मागणी झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व शासनाच्या संबंधित विभागाकडे जयसिंगपुरात पिलरवरील उड्डाणपुलाबाबत मागणीचा प्रस्ताव आपण दिला आहे़ टोलविरोधी कृती समितीने उड्डाणपुलाची मागणी केली आहे़ याचा पाठपुरावा करू़
- उल्हास पाटील, आमदार
छेद देणारे रस्ते
सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रस्त्याअंतर्गत शिरोली व अंकली येथे टोलनाका उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर जयसिंगपूर येथे टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे़ टोलला टोला देण्यासाठी या समितीने चंग बांधला आहे़
आता जयसिंगपूर शहराला छेद देणारे तेरा रस्ते असल्यामुळे हेरवाडे कॉलनी ते पायोस हॉस्पिटल या मार्गावर पिलरवरील उड्डाणपुलाची मागणी समितीकडून केली आहे़ यामुळे उड्डाणपुलाच्या प्रश्नाने पुन्हा उचल खाल्ली आहे़
शहराचे विभाजन
सुरुवातीला उड्डाणपुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागाला देण्यात आल्यानंतर हा उड्डाणपूल फूटडोअर ब्रिज, भुयारी पूल असा मुंबईच्या धर्तीवर प्रस्तावित करण्यात आला होता़ उड्डाणपुलामुळे शहराचे दोन भागांत विभाजन होणाऱ त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहराचे विभाजन होता कामा नये, यावरही सूर उमटला होता़
यावेळी उड्डाणपुलावरून तयार झालेले समज-गैरसमज लक्षात घेऊन उड्डाणपुलाची तांत्रिक माहिती देऊन त्याचे फायदे-तोटे समजावून सांगण्यासाठी हालचाली झाल्या होत्या़