जयसिंगपुरात ज्यादा बिलावरून मारहाणीचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:32 AM2021-06-16T04:32:03+5:302021-06-16T04:32:03+5:30
जयसिंगपूर : रुग्णाला डिस्चार्ज मिळूनही ज्यादा बिलाचा हिशेब विचारल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना उद्धट भाषा वापरली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी ...
जयसिंगपूर : रुग्णाला डिस्चार्ज मिळूनही ज्यादा बिलाचा हिशेब विचारल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना उद्धट भाषा वापरली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याबाबत रात्री उशिरापर्यंत जयसिंगपूर पोलिसांत नोंद झाली नव्हती.
याबाबत माहिती अशी, शहरातील बसस्थानकालगत असणाऱ्या एका रुग्णालयात संभाजीपूर येथील एका रुग्णावर उपचार सुरू होते. त्या रुग्णाची प्रकृती खालावत असल्याने पुढील उपचारासाठी मिरजेला हलविण्यात येणार होते. मात्र, बेड नसल्याने एक दिवस उशिरा त्याला अन्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. रविवारी रुग्णाच्या नातेवाइकांना बिल देण्यात आले. या बिलाबाबत नातेवाइकांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता.
दरम्यान, सोमवारी नातेवाईक डिस्चार्ज घेण्यासाठी रुग्णालयात गेले. या वेळी यापूर्वीचे दहा हजार रुपये बिल होते. तर एक दिवसाचे तेरा हजार रुपयाचे बिल ज्यादा हॉस्पिटलकडून देण्यात आले. याचा हिशेब नातेवाइकांनी मागितला. यावर तेथील कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना उद्धट भाषा वापरली. संबंधित रुग्णाला पुढे जाऊन उपचार मिळणे गरजेचे होते. मात्र, डिस्चार्ज मिळत नसल्याने नातेवाइकांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत गोंधळ घातला. त्यामुळे रुग्णालयात एकच तारांबळ उडाली. या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर तत्काळ त्याठिकाणी पोलीस दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. एकूणच या घटनेची चर्चा मात्र शहरात दिवसभर रंगली होती.