‘जलयुक्त शिवार’मुळे जाखले, वाडीरत्नागिरी पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:34 AM2018-10-30T00:34:48+5:302018-10-30T00:34:51+5:30
कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन ...
कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेतील प्रभावशाली कामांमुळे पन्हाळा तालुक्यातील वाडीरत्नागिरी व जाखले ही दोन गावे पाणीदार बनली आहेत. तीन वर्षांपूर्वी ही गावे पाणीटंचाईचा सामना करत होती. गावातील प्राचीन तलावांना कचरा कोंडाळ्याचे स्वरूप आले होते. आता हे सर्व चित्र बदलले असून, वाडीरत्नागिरीतील गावतलाव चकाचक झाले आहेत, तर जाखलेतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पाणीटंचाईचे नावच या दोन गावांतून गायब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी म्हणून सोमवारी शासनातर्फे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्यक्षात येथील कामांची पाहणी केली असता, कोल्हापूर जिल्ह्यातील आदर्शवत असे काम जाखल्यात झाल्याचे दिसले. कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यांच्या नेतृत्वाखालील पाहणी दौºयात उपविभागीय जलसंधारण अधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कनिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गोंधळी, जाखलेचे सरपंच सागर माने, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांच्यासह वृत्तपत्र प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
जोतिबा डोंगरावरील कर्पूरेश्वर तलावाचा कचरा कोंडाळा झाला होता. जलयुक्त शिवार योजनेतून ३४ लाख रुपये खर्चून या तलावातील गाळ काढून त्याची डागडुजीही केली. आज या तलावाचे सुंदर जलाशयात रुपांतर झाले आहे. तेथे ८ टीसीएम पाणीसाठा आहे. डोंगरावरच यमाई या प्राचीन तलावातही या योजनेतून काम हाती घेतले, तथापि काही काम अजून अपूर्ण असल्याने या तलावाला मात्र अवकळा आली आहे. तेथील जवळच असलेल्या टेकडीवर समतल चरीचे काम झाले असून, यातून डोंगर उतारावरून वाहणारे पाणी अडवण्याचा प्रयोग राबविला आहे.
जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जाखले गावात गावकºयांनी एकत्र येऊन तब्बल ४८ दिवस सलग श्रमदान करून राळेगणसिद्धी व हिवरेबाजारचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गाव जलयुक्त घडवण्याची किमया साधली आहे.
गाव आणि आजूबाजूच्या परिसरात डोंगरमाथ्यावरून वाहणारे पाणी पायथ्याला अडवून त्यावर वर्षभर जलसमृद्धी आणि त्यातून गावची समृद्धी साधता येते, हे गावकºयांनी दाखवून दिले आहे. जमिनीत पाणी मुरवण्यासाठी तयार केलेल्या तलाव व ओढ्यांवर उपसाबंदी आहे. गावात बोअर मारता येत नाही. शिवाय घरगुती वापरातून निर्माण होणारे सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे गावात तुंबलेल्या पाण्याचे डबके सहसा दृष्टीस पडत नाही. यामागे सरपंच सागर माने यांची धडपड कारणीभूत आहे. गावकºयांनी जलयुक्त शिवार अभियानातून पाझर तलावाचे पुनर्जीवन केले, ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेतले, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेतल्यामुळे आज जाखलेच्या शिवारात पाणी खेळू लागले आहे.
गाळामुळे उत्पन्न तिप्पटीने वाढले
गावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनयोजना, लोकसहभागातून राबविले. जवळपास
११ हजार ५00 ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतात टाकण्यात आला; त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठा निर्माण होण्याबरोबरच चांगल्या दर्जाची माती शेतीस मिळाल्याने पिकांचे उत्पन्न तिप्पटीने वाढले आहे.