लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वाशीची जळ यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:23 AM2021-03-17T04:23:30+5:302021-03-17T04:23:30+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वाशी येथील बिरदेवाचे तीर्थक्षेत्र सुप्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारणत: नऊ किलोमीटर अंतरावर वाशी गाव आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे वाशी येथील बिरदेवाचे तीर्थक्षेत्र सुप्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहराच्या पश्चिमेस साधारणत: नऊ किलोमीटर अंतरावर वाशी गाव आहे. सुंदर अशी दगडी कमान भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. समोरच दीपस्तंभ, पठाराच्या सभोवार विविध वृक्ष भाविकांना गारवा देत वर्षानुवर्षे उभे आहेत.
येथील श्री बिरदेवाचे मूळस्थान कर्नाटक राज्यातील 'अलकनूर' या गावी आहे. त्यांना बादशहा त्रास देत होता. असे असताना पूर्ण वाशी गावावर अंधारी पडली. बादशहाने सेवकांना बोलावून अंधारी का पडली, याचा शोध घेण्यासाठी दोन धनगरांना बोलावले व त्यांना सांगितले की, आमच्या गावावर आलेले संकट हे तुम्ही दूर केले पाहिजे. बादशहाने दिलेल्या आदेशाचे पालन म्हणून धनगरांनी सिद्धपुरुषांचा शोध सुरू केला. शोध करता-करता हळदी-कांडगावच्या रानामध्ये भादोलेचा 'धुळसिद्ध' नावाच्या सिद्धपुरुषाचा सुगावा लागला.
त्यांची भेट घेऊन वृत्तांत कथन केला. धुळसिद्धला पाहून बादशहासह दरबार हसला आणि त्यांची चेष्टा करू लागला. यानंतर बादशहाने धुळसिद्धाची परीक्षा घेण्यासाठी मादी घोडी आणली व घोडीच्या पोटातील शिंगराचे वर्णन करावयास सांगितले. वर्णनाची सत्यता पाहण्यासाठी बादशहाने धुळसिद्धांना आदेश दिला की, घोडीचे पोट कापून शिंगरू बाहेर काढावे आणि ते जसे होते तसे पुन्हा पोटामध्ये घालून घोडी जिवंत करावी. बादशहाचे आव्हान धुळसिद्धांनी स्वीकारले आणि भंडाऱ्याची मूठ घोडीच्या पोटावर मारून बादशहाला पोटातील शिंगरुचे वर्णन सांगितले. घोडीचे पोट कापून शिंगरू बाहेर काढले असता धुळसिद्धांनी सांगितलेले वर्णन हुबेहूब तसेच होते. त्यानंतर धुळसिद्धांनी शिंगरू पुन्हा घोडीच्या पोटात घालून त्याच्यावर भंडाऱ्याची मूठ मारली तेव्हा कापलेली घोडी पुन्हा जिवंत झाली. धुळसिद्धांचे हे सामर्थ्य पाहून बादशहा अचंबित झाला.
धुळसिद्धांनी बादशहाला सांगितले, माझा देह जळाच्या पाण्यात आहे. त्यास बाहेर काढण्यासाठी तू मला मदत केली पाहिजेस. बादशहाने सर्व प्रकारची मदत देण्याचे वचन धुळसिद्धांना दिले. या दोघा धनगरांकडे ती जबाबदारी सोपविली. त्यानंतर धुळसिद्धांनी आपल्या सामर्थ्याने ढोल, दमाम, छत्री, साशान दिवट्याचे भार लावून -भंडाऱ्याच्या उधळणीसह पूजा-अर्चा करून वाशीजवळच्या डोहामध्ये प्रवेश केला. डोहातून श्री बिरदेवाचे प्रतीक असलेली आत्मलिंग गुंडी बाहेर काढून त्याची स्थापना वाशीच्या पठारावर असलेल्या कारीखुटाला (करबंदीचे झाड) व लेंक्यांचा ढिगाऱ्यात केली.
त्यानंतर बिरदेव घुळसिद्धावर प्रसन्न झाले. त्यांनी वाशी गावी स्थायिक होण्यास सांगितले. तू माझ्या भेटीला वाशीला दरवर्षी येत जा. मी तुझ्या भेटीला दर तीन वर्षांनी येत जाईन, असा वर दिला, अशी आख्यायिका सांगितली जाते. ही जळ यात्रा तीन वर्षांनी येते. बिरदेव मंदिराचा जीर्णोद्वार करण्यासाठी बादशहाच्या महालाचे नऊ दगडी खांब या ठिकाणी आणून त्याच्याआधारे 'श्रीं चे मंदिर उभारले गेले. ते खांब अद्यापही जसेच्या तसे आहेत म्हणून या ठिकाणी बसणाऱ्याने खोटे बोलू नये, असा संकेत आहेत. याची जपणूक आजही येथील धनगर समाजबांधव करत आले आहेत. या आख्यायिकेचा विचार करता हे मंदिर बादशाहीच्या अस्तानंतर स्थापले आहे, अशी येथील धारणा आहे; परंतु यासंदर्भात लिखित कागदोपत्री पुरावा मिळत. रोज पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत
अभिषेक, स्नान होऊन देवाची आरती होते. बिरदेवाचा जन्मकाळ वैशाखमध्ये चतुर्थीला मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
यात्रा दरवर्षी फाल्गुन शुद्ध द्वितीयेला भरते. दर तीन वर्षांनी होणारी यात्रा ही जळ यात्रा म्हणून मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील भक्ताच्या उपस्थितीत पार पडते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडते आहे.
....
बबन रानगे
सरसेनापती मल्हार सेना
फोटो कॅप्शन
परंपरागत सुरू असलेला कांडगाव (ता. करवीर) येथील नरके, मगदूम नाईक यांचा मानाचा गाडा बिरदेवाच्या भेटीसाठी भरदिवसा मशाल पेटवून जातो.