पुनर्वसनासाठी निलेवाडीकरांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:29 AM2021-08-18T04:29:54+5:302021-08-18T04:29:54+5:30

नवे पारगाव : निलेवाडी (ता. हातकणंगले) गावचे शंभर टक्के पुनर्वसन करावे या मागणीसाठी वारणा नदीजवळ चिकुर्डे पूल येथे ग्रामस्थांच्या ...

Jalasamadhi agitation of Nilewadikars for rehabilitation | पुनर्वसनासाठी निलेवाडीकरांचे जलसमाधी आंदोलन

पुनर्वसनासाठी निलेवाडीकरांचे जलसमाधी आंदोलन

Next

नवे पारगाव : निलेवाडी (ता. हातकणंगले) गावचे शंभर टक्के पुनर्वसन करावे या मागणीसाठी वारणा नदीजवळ चिकुर्डे पूल येथे ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी दुसऱ्यांदा जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

संपूर्ण गावच जलसमाधी घेण्यासाठी जमले होते. त्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी गोंधळ उडाला. दोन महिलांसह तिघांनी पुलावरून वारणा नदीत उडी घेताना पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.

दरम्यान, तहसीलदार प्रदीप उबाळे, वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी शासन दरबारी प्रश्न त्वरित मांडण्याचे अश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

१९५३, १९८९, २००५, २०१९ आणि जुलै २०२१ या कालावधीत पाच मोठे महापूर आल्याने गावचे शंभर टक्के पुनर्वसन होणे गरजेचे असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पोलिसांच्या नजरा चुकवून शेकडो महिला, पुरुष जलसमाधीसाठी तीन किलोमीटर अंतर पायी चालत वारणा नदीवरील चिकुर्डे पुलाजवळ जमले होते. त्यांना पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावून रोखले. मात्र, गर्दी वाढेल तशी शंभर टक्के आंबिल टेक येथेच पुनर्वसन करावे, असे महिलांच्या फलकांसह घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आक्काताई भापकर, जनाबाई शिंदे यांच्यासह दिनकर घाडगे, मारुती शिंदे, सौरभ खोत यांनी पुलावरून नदीत उडी टाकण्याचा प्रयत्न केला. पेठ वडगावचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून त्यांना ताब्यात घेतले. जमावाची समजूत काढून अमृतनगर रस्त्यावर आणले.

यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व कोडोलीचे सहा.पोलीस निरीक्षक दिनेश काशीद यांनी आंदोलकांची समजूत काढून पुनर्वसनाचा विषय वरिष्ठ पातळीवर होत असल्याने तुमच्या भावना व वस्तुस्थिती, अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देऊन शासकीय धोरणाप्रमाणे पुनर्वसन करण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत असल्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले. निवेदन तहसीलदार यांना देऊन हे आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा आंदोलनाचे प्रमुख माजी सरपंच सुभाष भापकर, बाबासाहेब माने, सरपंच वर्षाताई माने, उपसरपंच तानाजी जाधव यांनी घटनास्थळी केली.

यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, मंडळ अधिकारी अनिता खाडे, ग्रामविकास अधिकारी व्ही. डी. बोराडे, पोलीस पाटील दिलीप महाडिक यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी: १)निलेवाडी : जलसमाधी आंदोलनासाठी चिकुर्डे पुलावर जमा झालेले महिला व पुरुष आंदोलक २) निलेवाडी : येथील शंभर टक्के पुनर्वसन होण्याबाबतचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना सुभाष भापकर, बाबासाहेब माने, वर्षा माने, तानाजी जाधव यांनी दिले.

(छाया : दिलीप चरणे)

Web Title: Jalasamadhi agitation of Nilewadikars for rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.