जलसमाधी आंदोलन : कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 01:13 PM2021-11-19T13:13:32+5:302021-11-19T13:13:53+5:30
कोल्हापूर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी कोल्हापुरात आज, सकाळी पंचगंगा घाटावर एसटी कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार होते. ...
कोल्हापूर : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन करावे, यासाठी कोल्हापुरात आज, सकाळी पंचगंगा घाटावर एसटी कर्मचारी जलसमाधी आंदोलन करणार होते. मात्र, जलसमाधी घेण्यास निघालेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतले. आंदोलनाचा १२ वा दिवस उजाडला तरीही सरकारकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कोल्हापुरातील एसटी कर्मचारी संतप्त झाले असून हे आंदोलन अधिक तीव्र होतानाचे चित्र दिसत आहे.
तर दुसरीकडे सरकारकडून या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी एसटी महामंडळ केपीएमजी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सरकारकडून अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. तर एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र काही कर्मचारीच कामावर हजर झाले. यामुळे आंदोलनात फूट पडली. याचे पडसाद अनेक ठिकाणी दिसून आले. राज्यात अनेक ठिकाणी एसटीवर दगडफेक तर कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याच्या घटनाही घडल्या.
कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात १२ व्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. तरीही सरकार मागण्यांकडे दुर्लक्षच करीत राहिल्याने त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. यातूनच त्यांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्धार केला. मात्र पोलिसांनी वेळीच सावध होत आंदोलन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, एसटी प्रशासन रोजंदारी कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे. कुरुंदवाड, गगनबावडा, गडहिंग्लज आगारातून प्रत्येकी एक बस विविध मार्गावर सोडली. प्रशासन रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देऊन कामावर रूजू होण्यास भाग पाडत आहे. पण त्यास इतर कर्मचारी विरोध करीत आहेत. यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे.