पूरग्रस्तांच्या मदतीचा अध्यादेश न बदलल्यास जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:29 AM2021-08-24T04:29:06+5:302021-08-24T04:29:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तुटपुंजी मदतीचा निर्णय घेतला असून तो कदापि मान्य ...

Jalasamadhi if the flood relief ordinance is not changed | पूरग्रस्तांच्या मदतीचा अध्यादेश न बदलल्यास जलसमाधी

पूरग्रस्तांच्या मदतीचा अध्यादेश न बदलल्यास जलसमाधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने तुटपुंजी मदतीचा निर्णय घेतला असून तो कदापि मान्य करणार नाही. ३१ ऑगस्टपर्यंत पूरग्रस्तांच्या मदतीचा अध्यादेश न बदलल्यास १ सप्टेंबरला नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, महापुराबाबत अभ्यास गट नेमावा, पूरग्रस्तांचे विनाअट पुनर्वसन करावे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सोमवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता. ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात झालेल्या सभेत ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांची चेष्टा सुरू केली आहे. पुनर्वसनासाठी मूळ जागा ताब्यात घेण्याची भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत. रस्त्यांसह इतर शासकीय प्रकल्पासाठी चारपट दराने जमिनी खरेदी करता मग पूरग्रस्तांसाठी का नाही. कोल्हापुरात पहिल्यांदाच असा पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पुराच्या पाण्याचे अडथळे शोधण्याऐवजी मंत्री जयंत पाटील हे नदीला भिंत बांधण्याची भाषा करत आहेत. बोगद्यातून राजापुरात पाणी सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांना अशा प्रकारच्या खर्चिक कामात ‘रस’ असतो. महापूर येऊन एक महिना झाला. शेतकऱ्यांना अद्याप दमडीही मदत मिळलेली नाही. ‘स्वाभिमानी’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, युवा प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अनिल मादनाईक, जनार्दन पाटील, विठ्ल मोरे, वैभव कांबळे, रामदास कोळी यांनी मनोगत व्यक्त केले. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

‘चळवळ टिकली पाहिजे’

गेल्या तीन-चार वर्षांत सरकार विरोधात ‘स्वाभिमानी’चा मोर्चा निघालेला नव्हता. त्यामुळे या मोर्चात तरुण कार्यकर्त्यांची संख्या अधिक होतीच. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये उत्साह कमालीचा होता. बहुतांशी कार्यकर्त्यांनी ‘चळवळ टिकली पाहिजे’ असे लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या.

बेडकिहाळ येथे पूर परिषद

चिक्कोडी, अथणी या तालुक्यांत महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सीमाभागातील शेतकऱ्यांची बेडकिहाळ येथे पुढील आठवड्यात पूरपरिषद घेणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

वसंत भोसले, यदु जोशी यांच्या अभ्यासपूर्ण लेखांचा उल्लेख

‘लोकमत’चे कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांनी ‘महापूर आणि वास्तव’तर, मुंबईचे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांचा ‘टक्केवारीत राज्य अडकले, गडकरींचा वैताग’ या अभ्यासपूर्ण लेखांचा ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांनी उल्लेख करत कौतुक केले.

मोदींच्या कृपेने सोयाबीन उत्पादक देशोधडीला

नरेंद्र मोदी यांनी १५ लाख टन सोयाबीन आयात केल्याने दर निम्म्यावर आले. हेच हरहर मोदी, घरघर मोदी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप शेट्टी यांनी केली.

संसदेला घेराव घालण्यास मी पुढे असेन

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जाते. साखर कारखान्यांच्या बुडीत कर्जापोटी बँकांना ३ हजार कोटी दिले. मग शेतकऱ्यांना का वंचित ठेवता. केंद्राने थकवलेले महाराष्ट्राचे पैसे आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संसद व राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्यासाठी पुढाकार घ्यावा, आपण त्यांच्यासोबत असू, असे शेट्टी यांनी सांगितले.

मागण्याबाबत राज्य सरकारला ३१ ऑगस्टपर्यंत डेडलाईन देतो, त्याची पूर्तता न केल्यास १ सप्टेंबरला प्रयाग चिखली येथील दत्ताचे दर्शन घेऊन पूरग्रस्त भागातून जाऊन नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

महापूर रोखण्यासाठी शेट्टी यांनी सुचविले पर्याय

१५ ऑगस्टपर्यंत अलमट्टीच्या पाण्याची उंची ५०९ मीटर ठेवा

त्यानंतर ५२२ मीटरपर्यंत ठेवल्याने पूर नियंत्रणात राहू शकतो.

विसर्ग वाढल्याने अलमट्टीत ५ टीएमसी पाणी कमी झाले, तर अडीच-अडीच टीएमसी पाणी महाराष्ट्र- कर्नाटकने सोसावे.

कर्नाटक, आंध्रप्रदेश सरकारची परवानगी घेऊन पुराचे पाणी वळवणे, तसा करार करा.

कमानी पुलांची उभारणी करा.

Web Title: Jalasamadhi if the flood relief ordinance is not changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.