बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 07:26 PM2021-12-16T19:26:12+5:302021-12-16T19:26:55+5:30

बैलगाडा शर्यतीवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर कोल्हापूरसह ग्रामीण भागातील बैलगाडा शौकिनांनी या निर्णयाचे स्वागत हलगीच्या ठेक्यावर ताल धरत गुलालाची उधळण केली.

Jallosh in Kolhapur after the Supreme Court lifted the ban on bullock cart racing | बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण

बैलगाडा शर्यत : कोल्हापुरात शौकिनांकडून हलगीच्या ठेक्यासह गुलालाची उधळण

Next

कोल्हापूर : बैलगाडा शर्यतीवर घालण्यात आलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर कोल्हापूरसह ग्रामीण भागातील बैलगाडा शौकिनांनी या निर्णयाचे स्वागत हलगीच्या ठेक्यावर ताल धरत गुलालाची उधळण केली. तर अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निर्णयामुळे बैलगाडा मालकांना दिलासा मिळाला. तर येत्या काही दिवसातच पुन्हा शर्यतीचा धुरळा पाहायला मिळणार आहे.

कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. बैलगाडा शर्यतीवरील बंदी व सततच्या दुष्काळामुळे जनावरांतील खिल्लार जाती काही दिवसांत नामशेष होईल, अशी स्थिती निर्माण झाली होती. यातच आज, सात वर्षांनंतर न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला अटी व शर्ती घालून परवानगी दिली. यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले. न्यायालयाच्या या निर्णयाचे बैलगाडा शौकिनांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले.

कोल्हापूरसह कागल, उचगाव, कसबा बावडा, वडणगे, निगवे, केर्ली, आसुर्ले, पोर्ले, शिरोळ, राशिवडे, भोगावती, सांगली, आटपाडी, खानापूर, कऱ्हाड, पलूस, आष्टा, कर्नाटकातील विजापूर, चिकोडी, एकसंबा, जमखंडी, आदी भागात मोठ्या प्रमाणात यापूर्वी बैलगाडा शर्यती भरविला जात होत्या. पश्चिम महाराष्ट्रातून खास या शर्यती पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात या गावांमध्ये हजेरी लावतात. विशेषत: वार्षिक यात्रा, उरुसामध्ये या शर्यती आयोजित केल्या जातात. कर्नाटकातील एकसंबा आणि कागल येथील सांगाव माळावरील शर्यतीच्या बक्षिसाची रक्कम लाखात असते.

Web Title: Jallosh in Kolhapur after the Supreme Court lifted the ban on bullock cart racing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.