जल्लोष नडला : हवेत गोळीबार करणाऱ्या उचगावच्या तरुणास अटक-- बंदुकीसह चार रिकाम्या पुंगळ्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 02:07 PM2020-02-12T14:07:35+5:302020-02-12T14:09:24+5:30
शिंदे हा शिरोली एमआयडीसी येथे खासगी नोकरी करीत होता. काही वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती. काही कामधंदा करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोल्हापूर : पन्नास किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयी झालेल्या भाच्याच्या जल्लोषात सद्गुरू कॉम्प्लेक्स उचगाव (ता. करवीर) येथील भरवस्तीमध्ये दिवसा हवेत गोळीबार करून जल्लोष साजरा करणा-या तरुणास गांधीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. संशयित अश्विन बाळासो शिंदे (वय ३७) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून बारा बोअरची बंदूक आणि चार रिकाम्या पुंगळ्या जप्त केल्या. त्याने चारवेळा गोळीबार केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे, अशी माहिती करवीर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.
रविवारी (दि. ९) सकाळी ही स्पर्धा झाली. त्यामध्ये ५० किलोमीटर स्पर्धेत विजयी झालेला स्पर्धक अमेय देसाई हा घरी गेल्यानंतर त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाच्याच्या जल्लोषात अश्विन शिंदे याने आपल्या बंदुकीतून हवेत चारवेळा गोळीबार करून जल्लोष केला. अचानक गोळीबाराचा आवाज झाल्याने नागरिकांनी भीतीपोटी दरवाजे बंद करून घेतले. संशयित शिंदे याच्या नातेवाईक महिलेने गोळीबाराचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर प्रसारित केला. यासंदर्भात बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपअधीक्षक डॉ. अमृतकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. तत्काळ पोलिसांच्या पथकाने उचगावमध्ये शिंदेच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेऊन बंदूक जप्त केली. गोळीबार करताना उपस्थित लोकांचे जबाबही पोलिसांनी घेतले. शिंदे हा शिरोली एमआयडीसी येथे खासगी नोकरी करीत होता. काही वर्षांपूर्वी त्याने नोकरी सोडली होती. काही कामधंदा करीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव
अश्विन शिंदे याचा बंदूक परवाना आहे. शस्त्र हाताळण्याचे ज्ञान असतानाही त्याने राहत्या घरासमोर रस्त्यावर नागरिक आणि मुलांसमोर बेकायदेशीर हवेत गोळीबार केला आहे. त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असल्याचे डॉ. अमृतकर यांनी सांगितले.