कुरुंदवाड-शिरढोण पुलावरील जलपर्णी प्रवाहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:32+5:302021-07-22T04:15:32+5:30
कुरुंदवाड : येथील कुरुंदवाड पुलाला तुंबलेली जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली असून, पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त झाली आहे. त्यामुळे निसर्गाने ...
कुरुंदवाड : येथील कुरुंदवाड पुलाला तुंबलेली जलपर्णी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली असून, पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त झाली आहे. त्यामुळे निसर्गाने निर्माण केलेले संकट निसर्गानेच सोडविल्याने नदीने अखेर मोकळा श्वास घेतला आहे.
दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदी प्रत्येक वर्षी जलपर्णीने व्यापते. पावसाळ्यात पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यानंतर नदीला मुक्ती मिळते. यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात माॅन्सूनने जोर धरल्याने पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले होते. त्यामुळे कोल्हापूरपासून तेरवाड बंधाऱ्यांपर्यंत व्यापलेली जलपर्णी वाहून शिरढोण-कुरुंदवाड दरम्यान पुलाला तटून नदीपात्राला घट्ट व्यापून होती.
वाहून आलेली जलपर्णी पुलासह नदीकाठावरील गवती कुरण क्षेत्रात पसरली होती. पाण्याचा प्रवाह आणि जलपर्णीचा दाब यामुळे पुलाला धोका निर्माण झाल्याने तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पुलालगतची जलपर्णी हटविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना यश आले नव्हते. पाण्याची पातळी कमी होताच जलपर्णी नदीपात्रात तळाला जाऊन स्थिरावली होती. आठ दिवसांपूर्वी रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी होडीद्वारे नदीपात्रात उतरून जलपर्णी हटविण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने पाण्याच्या प्रवाहाने पात्रातील जलपर्णी वाहून गेल्याने नदीपात्राला मुक्ती मिळाली आहे. त्यामुळे नदीने मोकळा श्वास घेतला आहे.
---------------------
चौकट -
ओल्या चाऱ्याचे नुकसान
पंचगंगा नदीपात्राने जलपर्णीपासून मुक्ती घेतली असलीतरी कुरुंदवाड पुलापासून तेरवाड बंधाऱ्यापर्यंत शेतकऱ्यांच्या पोटमळीत जलपर्णी व्यापली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पात्रातील जलपर्णी वाहून गेली असली तरी नदीकाठावरील शेतातील जलपर्णी तसेच राहिल्याने जलपर्णी हटवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
फोटो - २१०७२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरढोण-कुरुंदवाड पुलाला तटलेली जलपर्णी वाहून गेल्याने पंचगंगा नदीला जलपर्णीपासून मुक्ती मिळाली आहे.