जमात-ए-इस्लामीचे आजपासून राज्यव्यापी प्रबोधन अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:23 AM2021-01-23T04:23:25+5:302021-01-23T04:23:25+5:30
कोल्हापूर : सामाजिक ध्रुवीकरण रोखून सौहार्दता वाढविण्यासाठी म्हणून जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे आजपासून ३१ जानेवारीपर्यंत राज्यभर प्रबोधन अभियान हाती घेतले आहे. ...
कोल्हापूर : सामाजिक ध्रुवीकरण रोखून सौहार्दता वाढविण्यासाठी म्हणून जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे आजपासून ३१ जानेवारीपर्यंत राज्यभर प्रबोधन अभियान हाती घेतले आहे. या निमित्ताने घरोघरी जाऊन लाेकांना शिक्षण व सामाजिक सलोख्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा संघटक नदीम सिद्दिकी व अन्वर पठाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.
जमात-ए-इस्लामी ही संघटना प्रबोधनाचा वसा घेऊन समाजाची उभारणी नैतिक अधिष्ठानावर व्हावी या हेतूने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम घेते. यावर्षी कोरोनानंतरच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अंधारातून प्रकाशाकडे ही संकल्पना घेऊन २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत राज्यभर विविध उपक्रम घेतले आहेत. केवळ मुस्लीमच नव्हे तर सर्वधर्मीय लाेकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यात सहिष्णुता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कोल्हापुरातही शाहू मिनी सभागृहात व्याख्यान, वैयक्तिक भेटीगाठी, पोलीस स्टेशन, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या भेटीगाठी घेऊन चांगले विचार लोकांमध्ये रुजवण्यासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.