मेघा पानसरे यांना भाषांतरासाठीचा ‘जांभेकर पुरस्कार’ : मिलिंद चंपानेरकर यांचाही गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:51+5:302021-08-28T04:27:51+5:30
कोल्हापूर : आद्य पत्रकार, अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट भाषांतरकाराला दरवर्षी दिला जाणारा बाळशास्त्री ...
कोल्हापूर : आद्य पत्रकार, अनुवादक बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे उत्कृष्ट भाषांतरकाराला दरवर्षी दिला जाणारा बाळशास्त्री जांभेकर भाषांतर पुरस्कार डॉ. मेघा पानसरे यांनी केलेल्या ‘सोविएत रशियन कथा’ या लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला, तर २०२० सालचा पुरस्कार प्रफुल्ल बिडवईलिखित ‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ या पुस्तकाच्या भाषांतरासाठी मिलिंद चंपानेरकर यांना शुक्रवारी जाहीर झाला.
पुस्तकांची निवड प्रफुल्ल शिलेदार, प्रा. सुनंदा महाजन, प्रा. रणधीर शिंदे व डॉ. नितीन रिंढे यांच्या समितीने केली. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक गो.वि. ऊर्फ विंदा करंदीकर यांनी या पुरस्कारासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राला दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात येतो. ‘सोविएत रशियन कथा’ या पुस्तकात सुमारे शंभर वर्षांच्या काळातील रशियन कथांची भाषांतरे केली आहेत. डॉ. मेघा पानसरे या रशियन भाषेच्या तीस वर्षे अभ्यासक आहेत आणि त्यांनी ही भाषांतरे थेट रशियनमधून केली आहेत. जागतिक कथासाहित्याचा अभ्यास करणाऱ्या वा त्यात आस्था असलेल्या मराठी वाचकाला एका भाषेतील कथासाहित्याचा एक पट सापडतो. मूळ भाषेतील लहजा जाणवून देताना लक्ष्य भाषेतील सहजपणा या भाषांतरात साधलेला दिसतो. पानसरे यांनी वेरा पानोवा यांचे पुस्तक ‘सिर्योझा’, मक्सिम गोर्की यांचे ‘तळघर’ तसेच आत्मजितसिंह यांचे ‘सारंगी’ हे नाटक भाषांतरित केले आहे.
‘भारतातील डाव्या चळवळींचा मागोवा’ हा प्रफुल्ल बिडवईलिखित मूळ इंग्रजी ग्रंथ अतिशय साक्षेपाने आणि व्यासंगपूर्ण लिहिला आहे. भारतातील डाव्या चळवळीची विश्वासार्ह, माहितीपूर्ण आणि अंतर्दृष्टी देणारे हे पुस्तक मिलिंद चंपानेरकर यांनी अतिशय सहज भाषेत मराठीत आणल्याने हा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ मराठीत भाषांतरित झाला आहे.
फोटो : २७०८२०२१-कोल-मेघा पानसरे पुरस्कार