कलम ३७0 रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर राष्ट्रीय प्रवाहात : माधव भंडारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:02 PM2019-10-01T12:02:04+5:302019-10-01T12:05:02+5:30
कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान ...
कोल्हापूर : एका देशात दोन पंतप्रधान, दोन घटना आणि दोन राष्ट्रध्वज मुळीच चालणार नाहीत, ही राष्ट्रीय ऐक्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली. त्यामुळेच भाजपने ३७० कलम रद्द करत खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरला राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचे मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवारी दुपारी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारी म्हणाले, स्वातंत्र्यानंतर एकेकाळी काश्मीरमध्ये जाण्यासाठी व्हिसाप्रमाणे अन्य भारतीयांना परमिट घ्यावे लागत होते. याविरोधात जनसंघाने मोठे जनआंदोलन उभारले. संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांना त्याबद्दल २१ दिवस तुरुंगवास झाला. त्यांच्या बलिदानाची परिपूर्ती हे कलम रद्द करून भाजपने केली आहे.
हे कलम रद्द झाल्याने आता केंद्र सरकारच्या रोजगार हमीपासून शिक्षण, रस्ते, आरोग्य सुविधांच्या विविध योजना थेट जम्मू-काश्मीरमध्ये अवलंबल्या जातील. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असाच हा निर्णय आहे.
स्वागत जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, नगरसेविका भाग्यश्री शेटके, लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायणन, अॅड. संपत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक आर. डी. पाटील, बाबा इंदूलकर, नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे-पाटील, अनिरुद्ध कोल्हापुरे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, रवींद्र मुतगी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी उपस्थित होते.