भाजप ओबीसी मोर्चातर्फे ‘जनआक्रोश’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:18 AM2021-06-04T04:18:37+5:302021-06-04T04:18:37+5:30
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ...
कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त इतर मागास आरक्षण रद्द ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे हे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने गुरुवारी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे व ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आले.
सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला.
संदीप कुंभार म्हणाले, या आरक्षण रद्द निर्णयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. १२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ओबीसी समाजासाठी “लवकरात लवकर ‘राज्य मागासवर्गीय आयोगाचे’ गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा जमा करून तो तत्काळ न्यायालयास सादर करावा, असे आदेश दिले होते. याला पंधरा महिने झाले तरीही अजून राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापनाही करण्यात आलेली नाही.
राहुल चिकोडे म्हणाले, ज्या गोपीनाथ मुंडे यांनी मोठा संघर्ष उभारून ओ.बी.सी. समाजाला अनेक सवलती मिळवून दिल्या. त्यांच्या स्मृतीदिनी आम्ही हे आंदोलन छेडले आहे. केवळ ठाकरे सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे हे आरक्षण रद्द झाले आहे.
यावेळी भाजप सरचिटणीस हेमंत आराध्ये, गणेश देसाई, ओ.बी.सी. महिला मोर्चा प्रमुख विद्या बनछोडे यांची भाषणे झाली.
यावेळी भाजप सरचिटणीस दिलीप मेत्राणी, दिग्विजय कालेकर, विजय आगरवाल, महेश यादव, राजाराम परिट, अरविंद वडगावकर, दीपक पेटकर, प्रकाश कालेकर, सतीश यादव, संजय खेडकर, श्रीशैल्य स्वामी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
०३०६२०२१ कोल बीजेपी ०१
भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने गुरुवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदाेलन करण्यात आले.