जनसुराज्य-काँग्रेस आघाडीची मुसंडी : शाहूवाडी तालुका ग्रामपंचायत निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 09:42 PM2018-05-31T21:42:12+5:302018-05-31T21:42:12+5:30
शाहूवाडी तालुक्यात नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जनसुराज्य व काँग्रेस आघाडीने तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे.
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात नुकत्याच झालेल्या अकरा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जनसुराज्य व काँग्रेस आघाडीने तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी युतीला आत्मचिंतन करावयास भाग पाडले आहे. तालुक्याचे प्रमुख ठिकाण असणाऱ्या शाहूवाडी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य व काँग्रेस आघाडीचा सरपंच मताधिक्याने विजयी झाला आहे.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ‘हम भी किसीसे कम नही’ असे सेनेला दाखवून दिले आहे. सभापती डॉ. स्नेहा जाधव यांच्या शाहूवाडी गावात सेनेचा पराभव झाला आहे. येथून पुढे येणाºया निवडणुका दोन्ही आघाड्या मोठी व्यूहरचना करून लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
तालुक्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मानसिंगराव गायकवाड, जनसुराज्य पक्षाचे माजी मंत्री डॉ. विनय कोरे, काँग्रेसचे कर्णसिंह गायकवाड या चार गटांचे राजकारण सुरू आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना मानणारा मतदारदेखील आहे. सेना-राष्ट्रवादी, तर जनसुराज्य व काँग्रेस अशी युती आहे. या दोन्ही युतीमध्ये लढत सुरू आहे.
तेरा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक व एका पोटनिवडणुकीचा निकाल झाला. गावडी, कासार्डे या दोन्ही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर गटप्रमुखांनी आपल्या सोयीनुसार निवडणुका लढविल्या, तर काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना जनसुराज्य अशी विचित्र आघाडी स्थानिक पातळीवर दिसून आली.
सावे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सेनेचे खंदे कार्यकर्ते माजी पंचायत सदस्य नामदेव पाटील यांच्या सत्तेला सुरुंग लावून जनसुराज्य पक्षाचे ए. वाय. पाटील यांनी सत्ता काबीज केली. येथे सेनेचे गटप्रमुख टी. डी. पाटील, जनसुराज्य पक्षाचे भिंगले यांनी तिसरी आघाडी केली होती. त्यांनाही पराभवाची चव चाखावी लागली. येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षाला मदत केली.
आकुर्ळे ग्रामपंचायतीवर सेनेचे माजी सरपंच नथुराम पाटील यांची पंचवीस वर्षांची सत्ता गेली. येथे जनसुराज्य व काँग्रेस आघाडीने आपला झेंडा ग्रामपंचायतीवर फडकाविला. शाहूवाडी ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक सरपंचपदासाठी लागली होती. तीन अपत्य असल्यामुळे सेनेच्या सरपंच सविता संभाजी पाटील यांना सत्ता सोडावी लागली होती. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व जनसुराज्य पक्षाच्या वैशाली लाळे यांनी सेनेच्या उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.
पंचायत समितीच्या सभापती डॉ. स्नेहा जाधव व सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांच्या शाहूवाडी गावातच सेनेला पराभवाची चव चाखावी लागली. येथे जनसुराज्य पक्षाचे बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, काँग्रेसचे उपसरपंच दीपक जाधव यांनी व्यूहरचना करून ग्रामपंचायतीवर जनसुराज्य व काँग्रेसचा झेंडा फडकाविला.
माण ग्रामपंचायतीवर सेनेचे माजी पंचायत सदस्य सर्जेराव माणकर यांनी आपली सत्ता आणली. वालूर ग्रामपंचायतीवर सेना, राष्ट्रवादी या आघाडीने सत्ता आणली. गणीभाई ताम्हणकर, सीताराम पाटील यांना सत्ता आणण्यासाठी पराकाष्टा करावी लागली.
शेंबवणे, सावर्डे खुर्दे येथे जनसुराज्य-काँग्रेस युतीने सता काबीज केली. विरोधकांना काही हाती लागू दिले नाही. शेंबवणे येथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानदेव वरेकर, तुकाराम कांबळे, सावर्डे खुर्दे येथे पी. डी. पाटील या गटप्रमुखांनी आपलेगड राखले. गावात सत्ता आलीकी सर्वसामान्य मतदारांना विसरायचे नाही या निकालावरून स्पष्ट होते.
नवक्यांकडून धोबीपछाड
सर्वच गावांत गटप्रमुखांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. त्यामुळे चुरस वाढून एका मताला तीन हजार रुपयांचा दर काढला गेला. गावात आपल्या गटाची सत्ता येण्यासाठी मतदारांची चांदी झाली. या निवडणुकीत अनेक गटप्रमुखांना नवक्या गटप्रमुखांनी धोबीपछाड डावावर चितपट केल्यामुळे काही गटप्रमुखांची पंचाईत झाली आहे.