जनसुराज्यने पन्हाळगड राखला-- पन्हाळा जिल्हा परिषद विश्लेषण
By admin | Published: February 24, 2017 09:48 PM2017-02-24T21:48:27+5:302017-02-24T21:48:27+5:30
कोतोली गटात शिवसेनेचे अजित नरके यांचा पराभव आमदार चंद्रदीप नरके यांच्या जिव्हारी लागला.
नितीन भगवान --पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने अपेक्षित यश मिळविले असले, तरी भाजप व राष्ट्रवादीने आपले खाते उघडून आश्चर्याचा धक्का दिला आहे. जनसुराज्यची गेल्यावेळेपेक्षा संख्याबळ एकने कमी झाले.
नरके-पाटील गटाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. पन्हाळा पूर्व भागात कोडोली व सातवे येथे जनसुराज्य पक्षाने मुसंडी मारली असली, तरी सातवे गटातील विजय हा कमी मताधिक्याचा असून, तो विजय जनसुराज्य पक्षाला महत्त्वपूर्ण होता. कोडोली गटातील आतापर्यंतच्या निवडणुकीतील मताधिक्य पाहता हा विजय उच्चांकी मताचा आहे. वास्तविक अमरसिंह पाटील हे माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांचे सुपुत्र असल्याने त्यांनी सुरुवातीपासून सातवे गटात निवडणुकीची तयारी केली होती. सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे दावेदार ते होते. मात्र, विनय कोरे यांनी या गटात विशेष लक्ष देऊन पाटील गटाचे राजकारण संपुष्टात आणले. पोर्ले तर्फे ठाणे गटात प्रियांका पाटील ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असताना चुलते बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) यांनी त्यांना राजकारणात आणून आपल्या पराभवाचा वचपा काढला. यवलूज गटात भारतीय जनता पक्ष व जनसुराज्य यांची मैत्रिपूर्ण लढत झाली. यामध्ये कल्पना केरबा चौगुले ह्या भाजपच्या उमेदवार विजयी होऊन गेल्या निवडणुकीतील पती केरबा चौगुले यांच्या पराभवाचा ठपका दूर केला. याठिकाणी जनसुराज्यने आपला उमेदवार उभा करणे भाजपला अपेक्षित नव्हते. ही लढत मैत्रिपूर्ण होती का? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.कोतोली व कळे हे दोन्ही गट शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते; पण यावेळी कळे गटात शिवसेनेचे विजयी उमेदवार सर्जेराव पाटील यांचे मताधिक्य पाहता सेनेच्या मताधिक्यात घट झाली असल्याचे चित्र आहे. यावरून आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व कमी झाल्याचे दिसून येते. कोतोली गटात शिवसेनेचे अजित नरके यांचा पराभव आमदार चंद्रदीप नरके यांच्या जिव्हारी लागला.